राज्यसभेमध्ये बुधवारी झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. विरोधी पक्षांनी यासाठी सत्ताधारी मोदी सरकारला जबाबदार धरलं असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र हा काँग्रेससहीत विरोधकांचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेमध्ये पेगॅसस, कृषी कायदे या मुद्द्यांवरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी तुफान गदारोळ घातला. यावेळी मार्शल्सकरवी हा सर्व गोंधळ आवरावा लागला. यावेळी मार्शल्सनी चुकीच्या पद्धतीने राज्यसभा सदस्यांना वागणूक दिल्याचा दावा विरोधकांनी केला. एक महिला खासदाराची एका महिला मार्शलसोबत धक्काबुक्की झाल्याचं राज्यसभेतील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या महिला म्हणजे काँग्रेस खासदार छाया वर्मा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आपण माफी का मागावी? असा उलट सवाल छाया वर्मा यांनी केला आहे.

राज्यसभेतील राड्याचं CCTV फुटेज आलं समोर!

राज्यसभेत बुधवारी राडा झाल्यानंतर त्या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज गुरुवारी सकाळी एएनआयनं आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केलं. या फूटेजमध्ये विरोधी बाकांवरील सदस्य आक्रमक झालेले असतानाच त्यांनी वेलमध्ये येऊन नारेबाजी करायला सुरुवात केली. यावेळी त्यांना आवरण्यासाठी मार्शल्स बोलावण्यात आले. या मार्शल्सनी नंतर राज्यसभेत एक कडंच तयार केलं. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी माफीची मागणी केली आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिला खासदार छाया वर्मा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, यावर छाया वर्मा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

जाऊन पियुष गोयल यांना विचारा…!

या गोंधळाविषयी आणि महिला मार्शलशी झालेल्या धक्काबुक्कीविषयी छाया वर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी उलट सत्ताधाऱ्यांवरच निशाणा साधला. “आमचे एक खासदार कालच्या घटनेमध्ये जखमी झाले आहेत. त्यांना चुकीची वागणूक दिली गेली. पियुष गोयल यांना विचारा की सभागृहात इतके मार्शल्स ठेवण्याचं कारण काय? मी का माफी मागू?” असा प्रश्न छाया वर्मा यांनी विचारला आहे.

 

Video : विरोधकांची नारेबाजी, मार्शल्सची कारवाई.. राज्यसभेतल्या CCTV मध्ये कैद झाला गदारोळ!

आम्ही लोकांचा आवाज पोहोचवतो

दरम्यान, सभागृह चालवणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं छाया वर्मा यावेळी म्हणाल्या. “या प्रकाराला कोण जबाबदार आहे? संसदेचं कामकाज चालवणं ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही फक्त लोकांचा आवाज संसदेत मांडतो. जर लोकांचा आवाज ऐकलाच गेला नाही, तर हे होणार”, असं देखील छाया वर्मा म्हणाल्या.

 

बाहेरून लोक आणले… राहुल गांधींचा आरोप – वाचा सविस्तर

काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “संसदेत खासदारांवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खासदारांना मारहाण करण्यासाठी बाहेरचे लोक आणले गेले. तरीही, ते अध्यक्षांच्या अश्रूंबद्दल बोलतात. सभागृह चालवणे हे अध्यक्षांचे काम आहे”, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

“ही लोकशाही आहे का?”; विधेयक मंजूर करताना मार्शल बोलवल्याने संजय राऊत संतापले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर टीका करताना आपल्या ५५ वर्षांच्या कारकिर्दीत असं काही बघितलं नसल्याचं म्हटलं आहे. “संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत.