Rakesh Jhunjhunwala Akasa Air, Lifetyle and Net Worth: भारताचे ‘वॉरन बफे’ अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवालांचे आज सकाळी निधन झाले. शेअर बाजारामध्ये पाच हजारांच्या गुंतवणुकीपासून सुरू केलेला प्रवास कोट्यावधींच्या घरात पोहोचवण्याची किमया साधणाऱ्या झुनझुनवाला यांचा प्रवास थक्क करणारा आहे. शेअर बाजारामध्ये केवळ श्रीमंत नाही तर सर्वसामान्य नागरिकही गुंतवणूक करून नफा कमवू शकतात, हा विश्वास राकेश झुनझुनवालांमुळेच ट्रेडर्समध्ये निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राकेश झुनझुनवाला ‘या’ शेअरमुळे बनले ‘बीग बुल’

२००३ साली राकेश झुनझुनवाला यांनी टाटा समुहाच्या ‘टायटन’ या कंपनीत गुंतवणूक केली होती. याच शेअरने त्यांचे नशीब पालटले. प्रत्येकी तीन रुपयांच्या दराने एकुण सहा कोटी शेअर त्यांनी विकत घेतले होते. आज या शेअरची किंमत १ हजार ९६१ रुपये आहे. ‘टायटन’ हा त्यांच्या आवडत्या शेअर्सपैकी एक शेअर होता.

त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा मोटर्स, टाटा कम्युनिकेशन्स, ल्यूपिन, टीवी 18, डीबी रियल्टी, इंडियन होटल्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, फेडरल बँक, करुर वैश्य बँक, एस्कॉर्ट्स लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

एअरलाईन क्षेत्रात टाटांना टक्कर…

राकेश झुनझुनवाला यांनी काही महिन्यांपूर्वीच ‘अकासा’ एअरलाईन सुरू केली होती. एअरलाईन क्षेत्रामध्ये दबादबा असलेल्या टाटा समुहाच्या ‘एअर इंडिया’ या एअरलाईन्ससाठी हे मोठं आव्हान मानलं जात आहे. टाटा समुहाच्या शेअर्समधून कोट्यावधी कमावल्यानंतर आता याच कंपनीच्या एअरलाईन्सला ‘अकासा’ एअरलाईन्स टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

‘अकासा’ एअरलाईन्सच्या विमानाने ७ ऑगस्टला मुंबई ते अहमदाबाद या मार्गादरम्यान पहिले उड्डाण केले होते. या एअरलाईन्सने पहिल्या टप्प्यात मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान २८ साप्ताहिक उड्डाणे सुरू केली आहेत. अकासा एअरलाईन्ससाठी राकेश झुनझुनवाला यांनी ‘बोईंग’ या विमान उत्पादक कंपनीकडून ७२ विमानं विकत घेतली होती. ९०० कोटींच्या आसपास हा व्यवहार होता.

नव्या घरात राहण्याचं स्वप्न अखेर अधुरचं!

मुंबईतील उच्चभ्रू आणि महागडा भाग समजल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये राकेश झुनझुनवालांच्या १४ मजली इमारतीचं काम सध्या सुरू आहे. सध्या ते कुटुंबीयांसोबत दोन मजली अपार्टमेंटमध्ये राहत होते. मलबार हिलमधील घरासाठी झुनझुनवाला यांनी तब्बल ३७१ कोटींना जमीन खरेदी केली होती. या परिसरात अनेक राजकीय नेत्यांसह सज्जन जिंदल, आदी गोदरेज, बिरला हे मोठे उद्योगपती राहतात.

शेअर बाजारातील बीग बूल ते चित्रपट निर्माते…

राकेश झुनझनवालांनी शेअर बाजाराव्यतिरिक्त अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली होती. भारतीय चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्येही त्यांनी पैसा गुंतवला होता. ‘इंग्लिश विंग्लिश’,’शमिताभ’,’ की अँड का’ या चित्रपटांचे ते निर्माते होते.

राकेश झुनझुनावाला खाण्यापिण्याचेही शौकिन होते. मुंबईतील पावभाजी त्यांना विशेष आवडायची. फुड शो पाहण्याचा त्यांना छंद होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh jhunjhunwala death know about akasa air lifestyle hobbies career house cars net worth family rvs
First published on: 14-08-2022 at 11:49 IST