हरियाणामधल्या शेतकरी आंदोलनात शुक्रवारी गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाचे राज्यसभा खासदार राम चंदर जांगरा यांच्या गाडीवर आंदोलकांनी हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर आपल्यावर भाजपाच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी केला आहे.

जांगरा धर्मशाळेच्या पायाभरणीसाठी हिसारच्या नारनौंद शहरात गेले होते. आंदोलक शेतकऱ्यांना ते आल्याची बातमी समजताच आंदोलक तेथे जमा झाले आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांच्या हालचाली थांबवण्यासाठी बॅरिकेड्स लावले, परंतु ते पुढे जाण्यात यशस्वी झाले आणि कथितरित्या खासदारांच्या कारवर हल्ला केला आणि त्यांच्या गाडीची काच फोडली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी कारमध्ये बसलेल्या जांगरा यांनी “आपल्यावर हल्ला” केल्याचा आरोप करत नुकसानीसाठी आंदोलक शेतकर्‍यांना जबाबदार धरले आहे. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की “भाजपच्या गुंडांनी” त्यांच्यावर हल्ला केला, परिणामी एक आंदोलक गंभीर जखमी झाला. स्थानिक शेतकरी नेते रवी आझाद यांनी सांगितले की, शेतकरी कुलदीप राणा गंभीर जखमी झाला असून त्याला हिसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी नारनौंद पोलिस स्टेशनमध्ये बसले आणि त्यांनी शनिवारी तेथे पंचायत बोलावली आणि आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल केलेला एफआयआर मागे घेण्याशिवाय जांगरा आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

नारनौंदचे डीएसपी जुगल किशोर राम यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “कोणताही पोलिसांनी लाठीचार्ज केला नाही. रस्त्यावरील नाल्यात पडल्याने तो आंदोलक(राणा) जखमी झाला… खासदारांच्या गाडीचा विंडस्क्रीन तोडल्याबद्दल आम्ही दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. हंसीच्या एसपी नितिका गहलौत यांनी सांगितले की, उपचार घेत असलेल्या शेतकऱ्याच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा नाहीत. डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याने शेतकरी बेशुद्ध पडल्याचं पोलिसांनी सांगितले.