Dawood Ibrahim Location Dhuranndhar 2 RGV Reaction: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटाचा पहिला आणि दुसरा भाग गाजत आहे. धुरंधरच्या दुसऱ्या भागात ‘बडे साहब’ नावाचे पात्र असून ते कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमवर आधारित असल्याचे म्हटले जाते. बेडवर खितपत पडलेला, अनेक रोगांनी ग्रस्त असलेला दाऊद अजूनही पाकिस्तानातील गुन्हेगारी जगतावर नियंत्रण ठेवून आहे, हे चित्रपटात दिसते. धुरंधरचे सुरुवातीपासून तोंडभरून कौतुक करणाऱ्या राम गोपाल वर्मा यांनी या चित्रणावर असहमती दर्शवली आहे. दाऊदबद्दल त्यांनी काही दावे केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा दाऊद नेमका कुठे आहे? या प्रश्नाची चर्चा होताना दिसते.

आदित्य राज कौल यांनी थेट पत्ताच दिला

धुरंधर चित्रपटाच्या कथेसाठी दिग्दर्शक आदित्य धर यांना पत्रकार आदित्य राज कौल यांनी संशोधनात मदत केली होती. दाऊद इब्राहिम नेमका कुठे आहे? याबाबतचा उल्लेख कौल यांनी जय थाडेश्वर यांना दिलेल्या मुलाखतीत केला होता. दाऊद अजूनही पाकिस्तानात राहतो, हे खासगीत कुणीही मान्य करतात. मात्र त्यावर जाहीर भाष्य केले जात नाही, असे आदित्य राज कौल म्हणाले.

आदित्य राज कौल यांनी या मुलाखतीत काही धक्कादायक दावे केले आहेत. ते म्हणाले, “२०१७ च्या आसपास मी माझा रिपोर्टर दाऊदच्या पाकिस्तानमधील कराचीच्या घरात पाठवला होता. पाकिस्तानमध्ये दाऊदचे चार घर आहेत. क्लिफ्टन येथे व्हाईट हाऊस नामक दाऊदचे एक घर आहे. जे धुरंधर २ मध्येही दाखवले गेले आहे. याचबरोबर कराचीमध्ये आणखी तीन घरे आहेत. तसेच दुबईमध्येही दाऊदचे एक घर आहे.”

दाऊदला वेदनादायी मृत्यू द्यायचा आहे

दाऊद आजारी आहे, असे अनेकजण सांगतात. त्याच्या पायाला गँगरीन झाल्याचे म्हटले जाते. डिसेंबर २०२३ मध्ये काही घटना घडल्यामुळे दाऊद बेडवरच आहे, असे म्हटले जाते. भारतीय यंत्रणांना दाऊद कुठे आहे? हे पक्के माहीत आहे. जर भारतीय यंत्रणांनी ठरवले की, हाफिज सईद उद्याचा सूर्य पाहणार नाही, तर तो पाहणार नाही. पण भारतीय यंत्रणांनी ठरवले आहे की, हाफिज सईद काय किंवा दाऊद काय.. यांना एकत्र मारायचे नाही. तर त्यांना जर्जर करून मृत्यूच्या दारात न्यायचे आहे.

दाऊद विदेशी यंत्रणांच्याही रडारवर

गुन्हेगारी जगताचे वार्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार शीला रावल या दाऊदला प्रत्यक्ष पाहणाऱ्या काही निवडक पत्रकारांपैकी त्या एक आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लल्लनटॉप युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी दाऊदची दुबईत भेट कशी झाली, याची माहिती दिली. दाऊदला ज्याप्रमाणे भारतीय यंत्रणा शोधत आहेत, त्याप्रमाणेच विदेशी यंत्रणाही त्याला शोधत आहेत, अशी माहिती शीला रावल यांनी दिली.

दाऊद अधूनमधून भारतात यायचा?

दाऊद आणि अटकेपूर्वी छोटा राजनही समुद्राच्या मार्गाने भारतात येत होते, असा दावा ज्येष्ठ पत्रकार विवेक अग्रवाल यांनी केला होता. लाइव्ह हिंदुस्तान या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला. ‘जनसत्ता’साठीही विवेक अग्रवाल यांनी काम केले होते.

विवेक अग्रवाल लाइव्ह हिंदुस्तानच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले की, कराचीहून मालवाहू जहाजात दाऊद आणि इतर गुन्हेगार मुंबई किंवा गुजरातच्या बंदरापर्यंत आलेले आहेत. व्यावसायिक बैठका किंवा इतर भेटीगाठीसाठी त्यांनी हा मार्ग निवडला. अंडरवर्ल्डमध्ये या गोष्टी अतिशय सामान्य आहेत. याची खबर यंत्रणांनाही लागत नाही. कराची ते मुंबई येण्यासाठी १५ ते २४ तासांचा वेळ लागतो. तसेच मुंबईत त्यांच्यासाठी सांकेतिक नावे वापरली जात होती. दाऊदसाठी बडे हाजी आणि छोटा शकीलसाठी छोटे हाजी असे नाव वापरले जात होते, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

राम गोपाल वर्मा नेमके काय म्हणाले?

राम गोपाल वर्मा यांनी मुंबई आणि गुन्हेगारी जगतावर सत्या आणि कंपनीसारखे लोकप्रिय चित्रपट केले आहेत. या दोन चित्रपटांमुळे त्यांची ओळख निर्माण झाली. ‘दाऊदमुळे माझे घर चालते’, असे विधानही त्यांनी मागे एकदा केले होते. नुकतेच त्यांनी लेखक हुसेन झैदी यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांना धुरंधर चित्रपटातील दाऊद इब्राहिमच्या कथित चित्रणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर राम गोपाल वर्मा यांनी धुरंधरमधील चित्रणावर प्रश्न उपस्थित केले.

धुरंधर चित्रपटाबाबत बोलत असताना राम गोपाल वर्मा म्हणाले, “हा चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे. दिग्दर्शकाने त्याची कथा वेगळ्या पद्धतीने सादर केली असून लोकांना आवडत आहे. मात्र सिनेमातील एकाच गोष्टीशी मी सहमत नाही, ती म्हणजे दाऊदचे चित्रण. नक्कीच दिग्दर्शकाला काही स्त्रोतातून माहिती मिळाली असेल. पण मी हे नक्की सांगू शकतो की, दाऊद २० वर्षांपूर्वीच गुन्हेगारी जगतापासून दूर गेला आहे. प्रकृती किंवा इतर काही कारणे असतील पण तो स्वेच्छेने गुन्हेगारी जगतात सक्रिय नाही.”

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आजवर दाऊद इब्राहिमचे पात्र अनेकांनी रंगवले आहे. त्याच्यावर चित्रपट आलेले आहेत. दाऊदचे नव्वदच्या दशकातील उपलब्ध असलेल्या फोटोंवर चित्रपटात त्याचे पात्र रंगवले जाते. दाऊद आता कसा दिसतो किंवा तो सध्या नेमका कुठे आहे? याबद्दलची कोणतीही खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही. गुन्हेगारी जगताचे वार्तांकन करणारे पत्रकार आणि माजी पोलीस अधिकारी मात्र याबद्दल अनेक दावे करत आले आहेत.

धुरंधर २ चित्रपटात जर्जर झालेला बडे साहब दाखवल्यानंतर दाऊद सध्या कोणत्या अवस्थेत असेल, यावर अंदाज बांधले जात आहेत.