अखिलेश यादव यांच्या राम मंदिराबाबतच्या दाव्यानंतर, सोमवारी विशेष तपास पथकाने (SIT) मंदिराच्या दानपेट्यांची तपासाणी करायला सुरुवात केली आहे. हा तपास मंगळवारीदेखील चालू होता. विशेष तपास पथकाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या व्यवस्थापकांची, तसेच रोख रक्कम मोजणाऱ्या आणि नोटांचे बंडल बांधणाऱ्या कर्मचाऱ्यांची या प्रकरणी चौकशी केली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राम जन्मभूमी मंदिर न्यासाला मिळणारे कोट्यवधी रुपयांचे दान गायब झाल्याचा दावा केला. न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी यादव यांचा दावा फेटाळून लावला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीन सदस्यीय SITची समिती नेमली आहे.

प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन तपासणीला सुरुवात

दुपारी दोन वाजता SITच्या लखनऊ विभागाचे आयुक्त विजय विश्वास पंत, यांनी सर्वप्रथम प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातच दानपेट्यांची तपासणी करायला सुरुवात केली. दानपेटी कशी उघडली जाते? रक्कम कशी गोळा केली जाते? पैशांची मोजणी कशी केली जाते? या सगळ्या प्रक्रियेची सखोल तपासणी SITच्या पथकाने केली. ही तपासणी तब्बल आठ तास चालू होती. SITच्या पथकाने दानपेटीत थेट हात घालून पैसे काढता येतात का? हेदेखील प्रत्यक्ष करून पाहिले. परंतु, पैसे निघाले नाहीत.

स्टेट बँकेऐवजी खाजगी कंपनी करते पैशांची मोजणी

मंदिर परिसरात एकूण ४० दानपेट्या आहेत. दररोज या दानपेट्यांमधील रक्कम योग्य पद्धतीने काढली जाते. मंदिर बंद झाल्यावर एका विशिष्ट खोलीमध्ये सगळ्या दानपेट्या उघडण्यात येतात. या कार्यासाठी मंदिर न्यासाने स्टेट बँकेची नेमणूक केली आहे. पैशांची मोजणी करण्यासाठी स्टेट बॅंकेने वाराणासीतील एका खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. ज्या ठिकाणी हे मोजणीचे काम होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत जवळपास ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग असतो. या कर्मचाऱ्यांपैकी खाजगी कंपनीतील २४ कर्मचारी नोटांची केवळ जुडी बांधण्याचे काम करतात. न्यासाचे १२ कर्मचारी त्यांच्यावर नजर ठेवून असतात.

चौकशीदरम्यान व्यवस्थापकच अचानकपणे का निघून गेले?

सोमवारी SITच्या पथकाने या कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्याच्या वेळा तपासल्या. कर्मचारी कधी येतात? कधी जातात? कोणत्या नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली? कोणत्या कर्मचाऱ्यांनी काम सोडले? अशी मागील संपूर्ण वर्षाची माहिती त्यांनी घेतली. SITच्या अधिकाऱ्यांनी दानाच्या पावत्या, तसेच त्यासंबंधीच्या इतर कागदपत्रांची तपासणीदेखील केली. अखेरीस त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा सांभाळणाऱ्या टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. यादरम्यान मंदिर न्यासाच्या व्यवस्थापकांपैकी एक असलेले गोपाळ राव मात्र चौकशी सुरू असतानाच तिथून निघून गेले. राव यांनी मंदिराबाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देणेदेखील टाळले. तासाभरानंतर ते पुन्हा परतले.

SITच्या पथकाची चौकशी रात्री दहा वाजेपर्यंत चालू होती. समितीला अहवाल सादर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने १५ दिवसांची मुदत दिली आहे. अशा पद्धतीच्या संवेदनशील कामामध्ये एका खासगी कंपनीला समाविष्ट करणं चुकीचं आहे असे अखिलेश यादव यांचे म्हणणे आहे. त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटीव्ही रेकॉर्डिंगदेखील सार्वजनिक करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

कर्मचाऱ्याच्या घरात सापडले दहा लाख रुपये

पंतप्रधान मोदींनी २०२४ मध्ये राममंदिराचे उद्घाटन केल्यानंतर मंदिर न्यासाला कित्येक लाख-कोटी रुपयांचे दान मिळाले आहे. मागील वित्तीय वर्ष २०२४-२५मध्ये मंदिराचे उत्पन्न ३२७ कोटी रुपयांच्या जवळपास होते. या आकडेवारीतील १५३ कोटी रुपये केवळ देणगी स्वरुपात मिळाले.
आतापर्यंत पोलिसांना देणगी मोजणाऱ्या लवकुश मिश्रा या कर्मचाऱ्याच्या घरी १० लाख रुपये सापडले आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरू आहे. तरीही या पैशांचा देणगीशी काहीही संबंध आहे असं अजून तरी तपासातून समोर आलेलं नाही. SITच्या या चौकशीमधून आणखी काही गुपितं उघड होतात का? याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.