मानहानी खटल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वकील राम जेठमलानी यांनी उलटतपासणी दरम्यान अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात केलेले वक्तव्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अपमानजनक ठरवली आहेत. जेठमलानींनी ही वक्तव्ये जर केजरीवाल यांच्या सूचनेवरून केले असतील तर सर्वात प्रथम त्यांनी न्यायालयात यावे आणि जेटलींना उलट तपासणीपूर्वी प्रथम आपले आरोप करावेत, असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनमोहन यांनी म्हटले.

जर असे आरोप प्रतिवादीच्या (केजरीवाल) सांगण्यावरून करण्यात आले असतील तर वादीची (जेटली) उलटतपासणी करण्यात काहीच अर्थ नाही. प्रतिवादी एकला आरोप लावू द्यात. त्यांना न्यायालयात येऊद्यात, असे न्या. मनमोहन म्हणाले. जेटली यांचे वकील राजीव नायर आणि संदीप सेठी यांनी न्यायालयासमोर हे मुद्दे उपस्थित केले. न्यायालयातील वक्तव्ये ही केजरीवाल यांच्या सांगण्यावरून होते की, जेठमलानींनी याबाबत भाष्य केले, याचे स्पष्टीकरण केजरीवाल यांनी करावे, अशी मागणी केली होती.

जर केजरीवाल यांनी जेठमलानींना प्रतिकूल टिप्पणी करण्याच्या सूचना केल्या असतील तर त्यांच्याकडून मानहानीच्या दाव्यात आणखी १० कोटी रूपयांची वाढ करण्यात येईल, असे म्हटले. जर जेठमलानींनी स्वत:हून असे वक्तव्य केले असेल तर ते बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन असेल, असे नायर म्हणाले. अशा प्रकारच्या उलट तपासणीची परवानगी देता येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले. जेटलींच्या वकिलांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेल्या प्रतिकूल वक्तव्यांसंबंधी एक अर्ज दाखल करण्यास सांगितले.

अशा पद्धतीचे अपमानजनक वक्तव्ये केली जात असतील तर ते चुकीचे आहे. उलट तपासणी कायद्यानुसार झाली पाहिजे. जर अशा पद्धतीने एका बलात्कार पीडितेची उलटतपासणी केली तर तिच्यावर पुन्हा एकदा तेही भर न्यायालयात बलात्कार केल्यासारखा असेल, अशा शब्दांत न्या. मनमोहन यांनी सुनावले.