Ram Mandir CEO Jitendra Mishra controversy : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाच्या निवडीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये पसरणाऱ्या चुकीच्या माहितीचं आणि अफवांचं अधिकृतपणे खंडन केले आहे. ट्रस्टचे सरचिटणीस स्वामी गोविंददेव गिरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे ही पारदर्शक निवड प्रक्रिया कशी राबवली गेली, याचे वस्तुनिष्ठ पुरावे सादर केले आहेत.
निवड प्रक्रियेशी संबंधित महत्त्वपूर्ण तथ्ये
६ जुलै २०२६ रोजी स्थापन करण्यात आलेल्या शोध समितीकडे एकूण ५ हजार ५८५ अर्ज आले होते. दिल्ली एनसीआर, पुणे आणि संबलपूर या तीन शहरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि तज्ज्ञांच्या मदतीने बहुस्तरीय मूल्यमापन करून उमेदवारांची छाननी करण्यात आली. या प्रक्रियेतून १६ उमेदवारांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. ११ आणि १२ ऑगस्ट २०२६ रोजी अयोध्येत त्यांच्या प्रत्यक्षमुलाखती घेण्यात आल्या.
१ सप्टेंबर २०२६ रोजी समितीने आपला अंतिम अहवाल ट्रस्टला सादर केला. यामध्ये एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (निवृत्त), संजय प्रतापसिंह विश्वास राव आणि श्रुती भारद्वाज या तिघांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. २ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृतपणे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
प्रत्येक टप्प्याचं दस्तऐवजीकरण
काही प्रसारमाध्यमांमध्ये एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (निवृत्त) यांनी मुलाखत प्रक्रियेत भाग घेतला नसल्याचा दावा केला जात होता. हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि तथ्यहीन असल्याचं ट्रस्टने म्हटलं आहे. मिश्रा यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी पहिल्या सत्रात मुलाखत दिली होती. अंतिम तीन उमेदवारांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश असणे हाच त्यांच्या सहभागाचा आणि गुणवत्तेचा स्पष्ट पुरावा आहे, असं ट्रस्टने स्पष्ट केलं.
संस्थेच्या सुशासनाला आणि पारदर्शकतेला अनुसरूनच ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली असून प्रत्येक टप्प्याचं दस्तऐवजीकरण करण्यात आलं आहे, असं सांगत ट्रस्टने भविष्यातही अशाच प्रकारे अधिकृत माहिती दिली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.
