Ayodhya Ram Mandir Dharmadhwaj Feature Significance : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार, २५ नोव्हेंबर) मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण केलं. गेल्या वर्षी, जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती. परंतु, तेव्हा या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नव्हतं. अपूर्ण राहिलेलं बांधकाम गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्यात आलं आणि आज त्या मंदिरावर मोदी यांच्या हस्ते औपचारिकरित्या ध्वजारोहण करण्यात आलं.

या ध्वजारोहणासाठी खास मुहुर्त निवडण्यात आला होता. मंगळवारी सकाळी ११.४५ ते १२.२९ वाजेपर्यंत अभिजीत मुहुर्तावर ध्वजारोहण करण्यात आलं. याच अभिजीत मुहुर्तावर भगवान श्रीरामाचा जन्म झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ध्वजारोहणासाठी हा मुहुर्त निवडण्यात आला.

‘असा’ आहे ध्वज

भगव्या रंगाचा २२ फूट लांब व ११ फूट रुंद असा ध्वज आता मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर फडकताना दिसतोय. या ध्वजाचा ध्वजदंड ४२ फूट इतका उंच आहे. या ध्वजावर तीन चिन्ह आहेत. यामध्ये सूर्य, ऊँ आणि कोविदार वृक्षाचा समावेश आहे. सनातन परंपरांमध्ये भगवा रंग हा त्याग, बलिदान, वीरता व भक्तीचं प्रतीक मानला जातो.

कोविदार वृक्षाचं महत्त्व

ध्वजावरील कोविदार वृक्षाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक मान्यतांनुसार हा पारिजात व मंदार या वृक्षांच्या दिव्य संयोगातून बनलेला दिव्य वृक्ष आहे. आजच्या काळातील कचनार वृक्ष हा कोविदार वृक्षासारखा दिसतो. सूर्यवंशी राजांच्या ध्वजावर या वृक्षाची प्रतिमा असायची. महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणानुसार भरत राजाच्या ध्वजावर कोविदार वृक्षाची प्रतिमा होती.

आज जग राममय झालं आहे : मोदी

ध्वजारोहणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज या ध्वजारोहणानंतर आपला अनेक वर्षांचा यज्ञ पूर्ण झाल्याची भावना उफाळून आली आहे. आज सगळं जग राममय झालं आहे. भगवान श्री रामांचा हा धर्मध्वज, एक साधारण ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. या ध्वजातला भगवा रंग, यामधील सूर्यवंशाची ख्याती, ओम शब्द, यावर रेखाटलेला कोविदार वृक्ष या सगळ्यातून राम राज्याची किर्ती प्रतिरुपित होत आहे. हा ध्वज संकल्प व यशाचा आहे. ही संघर्षातून सृजणाची गाथा आहे. ही संतांची साधना आहे.