पीटीआय, नवी दिल्ली
राम मंदिरातील देणग्या अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (‘एसआयटी’) वेगाने तपास पूर्ण करावा आणि तर्कसंगत निष्कर्ष काढावा, असे निर्देश न्यायालयाने सोमवारी दिले. त्याबरोबरच याप्रकरणी केलेल्या तपासातील प्रगतीचा स्थिती अहवाल बंद लिफाफ्यात सादर करण्यासही ‘एसआयटी’ला सांगण्यात आले. या ‘एसआयटी’मध्ये न्यायसहाय्यक लेखापरीक्षकाचाही समावेश आहे.
देणग्या अपहार प्रकरणी सोमवारी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तपासाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी, या खटल्यातील विविध पक्षकारांनी केलेल्या सूचनांचाही वस्तुनिष्ठपणे विचार करावा, असेही खंडपीठाने ‘एसआयटी’ला सांगितले.
या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र संस्थेतर्फे किंवा सीबीआयतर्फे चौकशीची विनंती करणाऱ्या याचिकाकर्त्यांना तसेच अन्य सार्वजनिक हिताचा विचार करणाऱ्या व्यक्तींना आपापल्या सूचना महान्यायअभिकर्त्यांच्या कार्यालयात सादर करता येतील, अशी अनुमतीही न्यायालयाने दिली. महान्यायअभिकर्ता तुषार मेहता याप्रकरणी ‘एसआयटी’कडे सूचना वर्ग करतील, असे न्यायालयाने सांगितले.
