Ram Mandir donation row developments : श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य महंत दिनेंद्र दास महाराज यांनी अयोध्येतील राम मंदिर अपहार प्रकरणाशी संबंधित वादासाठी मंदिराचे प्रशासकीय सहाय्यक गोपाळ राव यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी राव यांच्यावर या मुद्द्याचं राजकारण केल्याचा आरोप केला आणि पूर्ण चूक त्यांचीच असल्याचं म्हटलं आहे.

संपूर्ण प्रकरणाला गोपाळ रावच जबाबदार

मंदिराच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यात आणि देणगी व्यवस्थापनात गोपाळ राव यांच्या भूमिकेची सध्या चौकशी सुरू आहे. बुधवारी वृत्तसंस्था ANI शी बोलताना महंत दिनेंद्र दास महाराज यांनी आरोप केला की, गोपाळ राव यांनी विनाकारण गुंतागुंत निर्माण केली असून ट्रस्टच्या पारंपारिक प्रथा परंपरांपासून ते दूर गेले आहेत. महंत दिनेंद्र दास महाराज म्हणाले, “गोपाळ राव नेहमीच सर्वांसाठी गोष्टी गुंतागुंतीच्या करतात. उत्तर प्रदेशातील आमचे विश्वस्त भगवान रामाच्या परंपरेचे पालन करतात, तर गोपाळ राव त्या परंपरेला मानतही नाहीत. या संपूर्ण प्रकरणाला गोपाळ रावच जबाबदार आहेत आणि ते राजकारण करत आहेत.”

सत्ताधारी-विरोधक आमने सामने

त्यांची ही विधाने अयोध्येतील राम मंदिराला मिळालेल्या देणगीच्या कथित अपहार प्रकरणाच्या सध्या सुरू असलेल्या एसआयटी (SIT) चौकशीदरम्यान आली आहेत. यावरून सत्ताधारी BJP आणि विरोधक यांच्यात जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे. दरम्यान, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी स्पष्ट केलं की, या प्रकरणातील दोषींना शिक्षा मिळालीच पाहिजे, मात्र कोणत्याही निरपराध व्यक्तीला नाहक गोवले जाऊ नये.

ANI ला दिलेल्या मुलाखतीत गुप्ता म्हणाले, “माझा मुद्दा सोपा आहे, दोषी सुटता कामा नये आणि कोणत्याही निरपराध व्यक्तीला गोवले जाऊ नये. ज्यांचा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नव्हता, अशा काही लोकांनाही यामध्ये ओढलं जात आहे आणि प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे. स्वाभाविकच, लोक यावर प्रतिक्रिया देतील. मला माहीत आहे की काही व्यक्ती तिथे निस्वार्थपणे काम करायचे, पण तुम्हाला माहीतच आहे, जर तुम्ही अशा प्रकरणात अडकलात, तर तुम्हालाही चोराचा शिक्का बसतो.”

गुप्ता पुढे म्हणाले की, या प्रकरणात अटकेची कारवाई झाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार न्यायिक कार्यवाही सुरू राहील. एकदा अटक झाली की त्यांना तुरुंगात पाठवावं लागतं. न्यायालयाने तारीख निश्चित केल्यावर सुनावणी पार पडणे आवश्यक असतं, मग ती प्रत्यक्ष उपस्थिती असो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. आजकाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सामान्य झाली आहे; सुरक्षेच्या समस्या असल्यास आरोपींना प्रत्यक्ष नेले जात नाही. न्यायालय कॉन्फरन्सिंगद्वारे हे हाताळते.”