अयोध्येतील भव्य राम मंदिरात अर्पण करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू आणि देणग्यांमध्ये घोटाळा झाल्याचा संशय आता पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. राम मंदिराच्या देणगी रेकॉर्डमधून तब्बल ६० किलो चांदीच्या विटा गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम लल्लाच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यादरम्यान या विटा मंदिराला दान करण्यात आल्या होत्या आणि त्या मंदिराच्या पायाभरणीत वापरल्या जाणार होत्या. याप्रकरणी सध्या विशेष तपास पथक सखोल तपास करत आहे. याबाबतचे वृत्त ‘इंडिया टुडे’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
रेकॉर्डमधून चांदी गायब; ज्वेलर्स असोसिएशनकडे पावती
गेल्या सहा दिवसांपासून ‘एसआयटी’चे पथक या चांदीच्या विटांच्या कागदपत्रांची आणि सध्याच्या स्थितीची पडताळणी करत आहे. मात्र, अधिकृत रेकॉर्डमध्ये या चांदीची नोंद, साठवणूक किंवा वापराबाबत कोणतीही स्पष्ट माहिती पोलिसांना मिळालेली नाही.
दुसरीकडे, चांदी दान करणाऱ्या ‘ज्वेलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अनुराग रस्तोगी यांनी सांगितले की, देशभरातील सराफा व्यापाऱ्यांच्या मदतीने ही ६० किलो चांदी गोळा करून मंदिराला देण्यात आली होती. या दानाची अधिकृत पावतीही त्यांच्याकडे आहे. परंतु, पायाभरणीच्या कार्यक्रमात किंवा नंतरच्या बांधकामात या विटा कुठेही दिसल्या नाहीत आणि त्यानंतर त्या गायब झाल्या.
मुख्य पुजारी आणि व्यवस्थापकांची चौकशी
या प्रकरणाचे गूढ वाढल्याने ‘एसआयटी’ने राम लल्लाचे चार पुजारी आणि दागिने-देणग्यांची देखरेख करणारे कृष्णदेव तिवारी यांची चौकशी केली आहे. मात्र, तिवारी यांनी या चांदीच्या विटांविषयी कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर मंदिरातून एक मौल्यवान हार आणि ‘चरण पादुका’ देखील गायब झाल्याचा संशय असून, त्याबद्दलही त्यांनी अनभिज्ञता दर्शवली आहे. याशिवाय, देणगी व्यवस्थापन पाहणारे ट्रस्टचे डॉ. अनिल मिश्रा यांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.
बनावट दागिने आणि रोख रकमेच्या अफरातफरीचा आरोप
राम मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले सोन्या-चांदीचे आणि हिऱ्यांचे खरे दागिने बदलून त्याऐवजी बनावट दागिने ठेवण्यात आले, तसेच रोख रक्कमेची अफरातफर झाली, अशा तक्रारींनंतर हा तपास सुरू झाला. ७ जून रोजी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हा मुद्दा उपस्थित करत न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. त्यानंतर, १३ जून रोजी उत्तर प्रदेश सरकारने ३ सदस्यीय ‘एसआयटी’ स्थापन केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येला भेट देऊन तपासाचे समर्थन केले. ते म्हणाले, “राम मंदिर ट्रस्टच्या विनंतीवरूनच ही ‘एसआयटी’ चौकशी सुरू करण्यात आली आहे. यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ज्या भक्तांनी मंदिरासाठी ५०० वर्षे वाट पाहिली, त्यांनी अयोध्येची नाहक बदनामी न करता, ‘एसआयटी’चा अहवाल येईपर्यंत आणखी १५ दिवस संयम ठेवावा.” सध्या लखनऊचे आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालील पथक या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खोदण्यात गुंतले आहे.
