– भुपेंद्र पांडे, एक्स्प्रेस

लखनऊ : अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावरून वातावरण आणखी तापले आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय संस्थांकडून होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा अन्य केंद्रीय संस्थेकडे हे प्रकरण सोपविण्याबाबत उत्तर प्रदेश सरकार विचार करत असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

हा आर्थिक गुन्हा असल्याने याची सखोल होणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रीय संस्थांकडून तपास करण्याच्या पर्यायाबाबत विचार सुरू आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने आपला प्राथमिक अहवाल बुधवारी सादर केला. त्यांना चौकशीसाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अटकेत असलेल्यांच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी चौकशी गरजेची आहे. या आठ संशयितांकडून आतापर्यंत ७९ लाख जप्त करण्यात आले आहेत.

सर्व विश्वस्तांची चौकशी

या प्रकरणात श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व विश्वस्त तसेच वरिष्ठ पदाधिकार्‍यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये चंपत राय, अनिल मिश्रा, गोपाल राव यांचा समावेश आहे. मंदिर व्यवस्थापनातील त्यांची भूमिका तसेच दानपेट्या याबाबत त्यांना विचारणा करण्यात आल्याचे सूत्रांनी नमूद केले. विश्वस्तांकडून दैनंदिन कामकाजाचे स्वरूप जाणून घेण्यात आले. दानपेट्या तेथील २० ते २५ कर्मचारी हाताळत होते. दानात मिळालेल्या रकमेची मोजणी सुभाष श्रीवास्तव, रामशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्या देखरेखीखाली लवकुश मिश्रा, अनुकलप मिश्रा, रामशंकर मिश्रा, मनिश कुमार यादव आणि करूणेश पांडे हे पार पाडत. त्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथकाने १६ ते २१ जूनदरम्यान त्यांची चौकशी केली होती. आता पुढील टप्प्यात सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी होईल.

विरोधकांची भाजपवर टीका

नवी दिल्ली : राम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावरून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट नेम साधत पाच प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने निष्पक्ष चौकशीची मागणी करत भाजपवर जोरदार टीका केली.

मर्यादेचे पहिले नाव म्हणजे श्रीराम आणि दुसरे संविधान. भाजपने या दोन्ही मर्यादांचा विश्वासघात केला आहे. ‘दूध का दूध और पानी का पानी’ होईल न होईल, पण चोरलेली चांदी आणि सोने परत मिळाले पाहिजे. श्रीराम दयाळू आहेत. सीसीटीव्ही बंद केले तर चोरीला गेलेल्या सर्व वस्तू परत येतील. भाजपने तसे आवाहन करावे. – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष