पीटीआय, नवी दिल्ली
अयोध्येतील राममंदिरातील देणग्यांमधील गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून काँग्रेसने रविवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘सर्व भाजपवाले ‘देणगीचोर’ नाहीत; पण सर्व ‘देणगीचोर’ भाजपमध्येच आहेत,’ अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथकाकडून निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
तिवारी यांनी देणग्यांच्या गैरव्यवहाराची सुरुवात मंदिर उभारणीपूर्वीच्या ‘शिळापूजन’ काळापासूनच झाल्याचा आरोप केला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी यांनी अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली. धार्मिक परंपरेनुसार शंकराचार्यांकडून विधी होणे अपेक्षित असताना त्यांना आमंत्रण देण्यात आले नाही. मंदिर न्यासातील सदस्यांची निवडही पंतप्रधानांच्या पसंतीनुसार झाली होती, असा दावाही त्यांनी केला.
‘पंतप्रधानांनी नैतिक जबाबदारीही घ्यावी’
मंदिर उभारणीचे श्रेय जर पंतप्रधानांनी घेतले असेल, तर मंदिरातील गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारीही त्यांनी स्वीकारली पाहिजे, असे तिवारी म्हणाले. केंद्र सरकार हे प्रकरण काळाच्या ओघात विस्मरणात जावे, अशी अपेक्षा करीत आहे. मात्र, हा विषय भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित आहे. काँग्रेस हा मुद्दा जनतेपर्यंत नेईल. दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरू राहील, असे ते म्हणाले.
राममंदिर नाटिकेवरील वाद चिघळला
’संसद परिसरात राममंदिरातील देणगी गैरव्यवहारावर सादर करण्यात आलेल्या नाटिकेवरून सुरू झालेला वाद रविवारी आणखी चिघळला. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू असताना गोंधळ उडाला. काही जणांनी त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या समर्थकांशी धक्काबुक्की झाली.
’ घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना पप्पू यादव यांनी ‘माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता,’ असा आरोप केला. काही तथाकथित साधूंकडून दररोज ‘मला ठार मारणार्याला ५१ लाख रुपयांचे बक्षीस देऊ,’ अशा धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
’ या घटनेतील एका व्यक्तीकडे चाकू असल्याचा आरोप करत, त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे यादव यांनी सांगितले.
