पीटीआय, अयोध्या
अयोध्येत राम मंदिरातील देणगी गैरव्यवहाराच्या घटनेने अपमानित आणि निराश वाटत आहे. हा प्रकार लज्जास्पद असल्याचे मत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले. अशा घटना घडू नयेत, यासाठी व्यवस्थापनात सुधारणा करण्यात येत असल्याचेही मिश्रा यांनी नमूद केले. शनिवारी मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राम मंदिर निर्माण समितीची बैठक पार पडल्यानंतर मिश्रा म्हणाले, राम मंदिर न्यासासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. व्यवस्थापनात करण्यात येणार्या सुधारणा तसेच अन्य उपाययोजनांबाबत न्यासाची पुढची बैठक २२ जुलै रोजी आयोेजित करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राम मंदिर कित्येक वर्षांच्या चळवळीचे फळ आहे. रामलल्लांचे दर्शन हा भाविकांसाठी एक अद्वितीय अनुभव आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या कमी होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
‘चौकशीतले निष्कर्ष हे हिमनगाचे टोक’
राम मंदिरातील देणगी गैरव्यवहारप्रकरणी विशेष तपास पथकाच्या तपासातील निष्कर्ष हे हिमनगाचे टोक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखेखाली स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केला आहे. खासदार अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, राम मंदिर न्यासाच्या स्थापनेपासूनच्या आर्थिक व्यवहारांचे लेखापरीक्षण करावे. तसेच लोकांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची गरज आहे.
राम मंदिरातील चोरीची घटना लज्जास्पद आहे. याबद्दल आम्ही केवळ दिलगीर नसून आमच्या मनात अपमानित आणि निराश झाल्याची भावना आहे. – नृपेंद्र मिश्रा, अध्यक्ष राम मंदिर निर्माण समिती
