लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावरून तीव्र झालेल्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर शुक्रवारी मौन सोडले. ही चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. आम्ही या घटनेने अत्यंत व्यथित झालो आहोत, अशी भावना संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केली. याप्रकरणी तपासात दोषी आढळणार्‍यांवर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाही होसबळे यांनी व्यक्त केली.

राम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) नियुक्त केले असून या पथकाद्वारे सखोल चौकशी केली जात आहे. आतापर्यंत ८ जणांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणावरून देशभर रोष व्यक्त होत असताना संघाने कोणतीही जाहीर प्रतिक्रिया न दिल्याने वादात आणखी भर पडली होती. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी शुक्रवारी निवेदन प्रसिद्ध करून संघाची भूमिका स्पष्ट केली. मात्र या निवेदनातून श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. होसबळे यांनी न्यासाशी संबंधित एकाही पदाधिकार्‍याच्या उल्लेख केलेला नाही हे विशेष!

‘पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षामुळे आणि लाखो रामभक्तांच्या समर्पण, त्याग आणि बलिदानामुळे श्रीराम जन्मभूमीवर बांधलेले (पान ८ वर) (पान १ वरून) भव्य मंदिर संपूर्ण हिंदू समाजासाठी आदर, श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. श्री रामलल्ला मंदिरातील दानपेट्यांमध्ये जमा केलेल्या निधीच्या चोरीच्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला धक्का बसला आहे आणि या घटनेमुळे आम्ही सर्वजण अत्यंत दु:खी झालो आहोत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या विनंतीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले असून त्याच्या शिफारशींच्या आधारे कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तपासात दोषी आढळलेल्यांना कठोर शिक्षा मिळावी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे’, असे होसबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सर्व रामभक्तांसाठी ही असाधारण घटना असून व्यवस्थापन आणि कामकाजातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत, असे मत होसबळे यांनी व्यक्त केले आहे. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह संपूर्ण हिंदू समाजाची स्वाभाविकच अपेक्षा आहे की, ट्रस्टने या अत्यंत निंदनीय घटनेला एक असाधारण घटना मानून व्यवस्थापन आणि कामकाजातील सर्व त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. जेणेकरून अयोध्या मंदिरातील लाखो रामभक्तांची श्रद्धा आणि भक्ती अबाधित व अढळ राहील,’ असे होसबळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

सध्याची गोंधळाची आणि अनिश्चिततेची स्थिती संपुष्टात आलीच पाहिजे. यासंदर्भात मंदिर व्यवस्थापन आणि सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने सर्व आवश्यक पावले उचलावीत, अशी आमची अपेक्षा आहे. आमचा विश्वास आहे की, योग्य आर्थिक व्यवस्थापन, सुरळीत कामकाजासाठी निर्दोष आणि पारदर्शक प्रणाली, तसेच पवित्रता, पावित्र्य आणि धार्मिक भावनांनी परिपूर्ण वातावरणाच्या माध्यमातून ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास’ हिंदू समाजाची श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ करत राहील, असेही नमूद करण्यात आले आहे.

गैरप्रकार खपवून घेणार नाही- कटियार

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराचे पावित्र्य जपले पाहिजे. राम मंदिराच्या मुद्द्यावर कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनय कटियार यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली आहे का, असे विचारले असता ‘पंतप्रधान माझ्याशी किंवा मी त्यांच्याशी जेव्हा गरज असेल, तेव्हा बोलू शकतो,’ असे संदिग्ध उत्तर त्यांनी दिले.

न्यासाच्या पाच वर्षांच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण

अयोध्या : राम मंदिर देणगी अपहार प्रकरणाची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने ‘श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या गेल्या पाच वर्षांच्या जमाखर्चाचे फेरलेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक तपासात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. फेरलेखापरीक्षणात बांधकामाशी संबंधित खर्च तसेच देणगी स्वरूपात मिळालेले दागिने आणि इतर सोने-चांदीच्या वस्तूंचा समावेश असेल. पाच वर्षांच्या कालावधीतील न्यासाच्या आर्थिक नोंदींची सखोल तपासणी करण्यात येणार आहे, असे ‘एसआयटी’ने सांगितले.

‘हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी कट!’

या घटनेचा फायदा घेऊन काही राष्ट्रविरोधी घटक देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा होसबळे यांनी निवेदनात केला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाजाला आवाहन करतो की, या कठीण काळात आवश्यक संयम आणि धैर्य दाखवावे आणि या दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन हिंदू धर्म आणि समाजाला बदनाम करण्याचे हिंदूविरोधी आणि राष्ट्रविरोधी घटकांचे कट उधळून लावावेत,’ असे आवाहन होसबळे यांनी केले.

ठाकरे गटाचे दादरमध्ये रामरक्षा पठण

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर गैरव्यवहाराविरोधात शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून दादरच्या हनुमान मंदिरात रविवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा पठण करण्यात येणार आहे. भाजपकडून राम मंदिरातच दरोडा टाकला जात असून हा चोरीचा पैसा पक्ष फोडण्याकरता वापरला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.