राम जन्मभूमी जमीन खरेदी भ्रष्टाचार; ट्रस्टनं आरोप फेटाळले, केला खुलासा…

राम मंदिर जमीन खरेदीवरून झालेल्या आरोपांना उत्तर… श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी निवेदन काढून यावर भूमिका मांडली

Ram mandir land scam, AAP SP allege, Ram temple Trust
राम मंदिर जमीन खरेदीवरून झालेल्या आरोपानं उत्तर… श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी निवेदन काढून यावर भूमिका मांडली. (छायाचित्र । इंडियन एक्स्प्रेस)

अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं काम सुरू असून, या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन केलेला आहे. या ट्रस्टने मंदिरासाठी जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या व्यवहारावरून आता वाद उभा राहिला आहे. आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी कागदपत्रं दाखवत ट्रस्ट सचिव चंपत राय यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीचे नेते आणि अयोध्येचे माजी आमदार पवन पांडे यांनीही जमीन खरेदी प्रकरणात भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेली जमीन अवघ्या काही मिनिटांत दोन कोटींवरून १८.५ कोटींना खरेदी केल्याचं म्हटलं आहे. हे सर्व आरोप ट्रस्टने फेटाळून लावले असून, त्यावर खुलासाही केला आहे.

खासदार संजय सिंह आणि माजी आमदार पवन पांडे यांनी राम मंदिर जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. “श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिरासाठी कमीत कमी दराने जमीन खरेदी केली आहे. काही राजकीय नेते लोकांची दिशाभूल करत आहेत. आरोप करणारे लोक राजकारणाशी संबंधित असून, राजकीय द्वेषातून आरोप करत आहेत. हे समाजाची दिशाभूल करण्यासाठी केलं जात आहे,” असं ते म्हणाले.

संबंधित वृत्त- “दोन कोटींची जमीन दहा मिनिटांत १८ कोटींना कशी घेतली?”; श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचा आरोप

“९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरासंदर्भातील मुद्द्यावर निकाल दिल्यानंतर देशभरातून लोक अयोध्येत जमीन खरेदीसाठी येऊ लागले. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले. ज्या प्लॉटची माध्यमांमध्ये चर्चा होत आहे, ती जागा रेल्वे स्थानक परिसराजवळ असलेली मोक्याची जागा आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट मंदिरासाठी आतापर्यंत जी जमीन खरेदी केली, कमीत कमी किंमतीत खरेदी केली आहे,” असं राय यांनी म्हटलं आहे. “संमती घेण्यात आल्यानंतर संबंधित कागदावर स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. सर्व प्रकारची कोर्ट फीस आणि स्टॅम्प पेपर सर्व ऑनलाईन खरेदी केलं जात आहे. जमिनीची खरेदी संमती पत्राच्या आधारावरच केली जात आहे. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे जमिनीचा मोबदला विक्रेत्याच्या खात्यावर ऑनलाईन जमा केला जातो,” असं राय यांनी म्हटलं आहे.

जमीन खरेदीतील भ्रष्टाचाराचा वाद काय आहे…?

आपचे राज्यसभेतील खासदार सदस्य आणि राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी जमीन खरेदी प्रकरणावरून श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “दोन कोटी रुपयांत विकत घेतलेल्या जमिनीचा भाव प्रत्येक सेकंदाला साडेपाच लाखानं वाढत गेला. भारतच काय तर जगातील कुठल्याच जमिनीचा भाव इतक्या वेगानं वाढत नाही. हे उघडपणे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. मी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारकडे अशी मागणी करतो, की याप्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी. तसंच या गंभीर भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकावं. हा प्रश्न देशातील करोडो राम भक्तांसह राम मंदिराच्या निर्माणासाठी आपल्या कष्टानं कमावलेले पैसे मंदिरासाठी देणाऱ्यांच्या विश्वासाचाही आहे,” असं प्रश्न सिंह म्हटलं आहे.

तर दुसरीकडे सपाचे नेते पवन पांडे यांनीही असाच आरोप केला आहे. म्हणाले,”बाबा हरिदास यांनी ही जमीन सुलतान अन्सारी आणि रवि मोहन तिवारी यांना विकली. त्यानंतर त्यांनी ही जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला विकली. काही मिनिटांत जमिनीचा भाव दोन कोटींहून १८.५ कोटी कसा होऊ शकतो. याची सीबीआयने चौकशी करावी,” अशी मागणी पांडे यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ram mandir land scam ayodhya land deal scam aap sp allege ram temple trust bmh