Ram Mandir Trust Scam Govind Dev Giri Statement: अयोध्येच्या राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरणी रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. सोमवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय व अनिल मिश्रा यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. देणगी घोटाळा प्रकरणात चंपत राय व अनिल मिश्रा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी चालू असून त्याद्वारे घोटाळ्याचा नेमका आवाका आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींची निश्चिती करण्याची प्रक्रिया चालू आहे. याचदरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे.

    गोविंद देव गिरींनी केली चंपत राय यांची पाठराखण

    राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी संबंधित देणगी अपहार प्रकरणावर एबीपीशी बोलताना त्यांची सविस्तर बाजू मांडली. यावेळी त्यांनी मंदिर ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांच्या स्वभावावर बोट ठेवलं. मात्र, हे करताना त्यांनी चंपत राय या प्रकारच्या घोटाळ्यात गुंतले असतील असं वाटत नाही, असं म्हणून त्यांची पाठराखण देखील केली.

    काय म्हणाले गोविंद देव गिरी?

    चंपत राय यांच्या स्वभावात दोष असून चारित्र्यात नाही, असा दावा गोविंद देव गिरी यांनी केला आहे. “चंपत राय यांच्याबद्दल मी एवढं सांगू शकतो की मी त्यांना तीन दशकांपासून ओळखतो. त्यामुळे या सगळ्या प्रकारात ते गुंतले असतील असं मला आजही वाटत नाही. कधीकधी ते त्यांना दिलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करायचे. त्यांना असं वाटायचं की सगळं काम मी सांभाळेन. हादेखील दोष आहे. पण हा स्वभावातला दोष आहे. इथे त्यांच्या चारित्र्याचा मुद्दा नाही. त्यांची वृत्ती अहंकारी होती हे खरं आहे”, असं ते म्हणाले.

    आम्हाला लाज वाटते – गोविंद देव गिरी

    दरम्यान, रामभक्तांनी भक्तिभावाने मंदिराला दिलेल्या दानाची अशा प्रकारे चोरी होणं लाजिरवाणी बाब असल्याचं गोविंद देव गिरी यांनी नमूद केलं. “एसआयटीचा अंतिम अहवाल आल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू. ट्रस्ट यासंदर्भात पुढील निर्णय घेईल. पण जे काही घडलं, त्याची आम्हाला शरम वाटते. वाईट वाटतंय. आम्हाला दु:ख झालंय. जे काही झालं, त्यासाठी आम्ही नक्कीच प्रभू रामलल्ला व राम भक्तांची माफी मागतो. पण आम्ही त्या लोकांची माफी मागणार नाही, ज्यांनी विनाकारण हा सगळा वाद उभा केला आहे”, अशा शब्दांत त्यांनी टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं.

    “मी राजीनामा देणार नाही”

    चंपत राय व अनिल मिश्रा यांच्याप्रमाणेच गोविंद देव गिरी यांनीदेखील राजीनामा द्यावा, अशी मागणी होत असतानाच त्यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आहे. “ट्रस्टच्या प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी आहे. त्यात माझीदेखील जबाबदारी आहेच. पण मी राजीनामा का देऊ? माझा याच्याशी संबंध नाही. खात्यात आलेल्या पैशांचा हिशेब ठेवणं हे माझं काम आहे. दानपेटीत आलेल्या पैशाशी माझा आधीपासून संबंध नव्हता, आजही नाहीये”, अशा शब्दांत त्यांनी राजीनाम्यास नकार दिला.