अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या तिहार तुरुंगात दिल्ली सामुदायिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी रामसिंग (वय ३३) याने सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. स्वतच्या कपडय़ांचा वापर करून त्याने त्याच्या कोठडीत गळफास घेतला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही आत्महत्या नसून हा खून असल्याचा आरोप रामसिंग याच्या कुटुंबीयांनी केला असून, या प्रकाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची मागणी केली आहे.
या आत्महत्येने राजधानीत खळबळ माजली. न्यायवैद्यक तज्ञांनी रामसिंग याला ठेवण्यात आलेल्या कोठडीला तातडीने भेट देऊन पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न केला. रामसिंग हा गेले काही दिवस निराश मनस्थितीत होता. त्याने रविवारी रात्री जेवणदेखील केले नव्हते, असे तुरुंगाच्या सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याच्या वकिलांनी हे म्हणणे फेटाळून लावले. संशयास्पद स्थितीत त्याचा मृत्यू झाल्याने दिल्ली सरकारने याबाबत दंडाधिकारीय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
‘आत्महत्येचा प्रकार घडला तेव्हा रामसिंग त्याच्या कोठडीत एकटा नव्हता. त्याच्याबरोबर इतर कैदीही होते. पण, यापैकी कोणालाच तो आत्महत्या करीत असल्याची चाहूल लागली नाही. रामसिंग हा केव्हाही अनावर होत असे. त्याच्या मनस्थितीत सारखे चढउतार होत असत. आत्महत्येची प्रवृत्ती त्याच्यात आढळून आल्याने त्याच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते, असे एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले.
रामसिंगची उत्तरीय तपासणी दिल्लीताल दीनदयाळ रुग्णालयात करण्यात येणार आहे. दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूदायिक बलात्काराच्या प्रकराने अख्ख्या देशाला हादरा बसला होता. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी रामसिंगला अटक करण्यात आली. ज्या बसमध्ये बलात्काराची घटना घडली तिचा तो चालक होता. प्रत्यक्षात घटनेच्या दिवशी त्याचा भाऊ मुकेश गाडी चालवीत होता.

‘राजधानीत हा बलात्कार खटला योग्य वातावरणात चालविता येणार नाही, यामुळे तो दिल्लीबाहेर चालविण्यात यावा, अशी मागणी रामसिंग याचे वकील व्ही.के.आनंद यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ती फेटाळण्यात आली. ही मागणी आता आपण पुन्हा करणार असल्याचे आनंद यांनी सोमवारी सांगितले. आरोपींच्या सुरक्षिततेबाबत आपल्याला शंका वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, न्यायालयाला सरकारकडून रामसिंग याच्या मृत्यूबद्दलची माहिती कळविण्यात आली. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी यासंदर्भात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली.

‘रामसिंग याने आत्महत्या केली नसून, त्याचा खून करण्यात आला आणि नंतर त्याला फासावर लटकविण्यात आले. याबाबतचे पुरावे नष्ट करण्यात आले. हाताला झालेल्या दुखापतीमुळे रामसिंगला त्याचा हात मोकळेपणाने हालविता येत नव्हता. यामुळे त्याने गळफास घेतला हे म्हणणे संशयास्पद वाटते. त्याची उत्तरीय तपासणी  आमच्यासमोर झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे,’ असे रामसिंगच्या वडिलांनी सांगितले.