नवी दिल्ली : जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर आता राम मंदिरातील देणगी अपहार प्रकरण राजकीयदृष्ट्या तीव्र होत आहे. विरोधी पक्षांनी, प्रामुख्याने समाजवादी पक्षाने हा मुद्दा पुन्हा लोकांच्या नजरेत आणण्यास सुरुवात केली आहे. संसदेच्या सभागृहांमध्ये सपच्या सदस्यांनी या मुद्द्यावरून घोषणाबाजी केलीच; पण, संसदेच्या आवारातही अनोख्या पद्धतीने देणगी अपहारचा मुद्दा मांडला जात आहे.

शुक्रवारी सकाळी संसदेच्या आवारात खासदार पप्पू यादव यांनी पुजाऱ्याचा वेश परिधान करून निर्माण केलेले नाट्य सगळ्याचे लक्ष वेधून गेले. या नाट्यमय आंदोलनाची गंभीर दखल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी घेतली. ‘वेगवेगळ्या वेशात येऊन आंदोलन करणे अनुचित असून संबंधितांवर कारवाई केली जाऊ शकते,’ असा इशारा बिर्लांनी दिला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांकडून विशेषतः काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यासाठी दररोज सकाळी मकरद्वारासमोर निदर्शने केली जात आहेत. गेले दोन दिवस त्यात राम मंदिरातील देणगी अपहाराच्या मुद्द्याची भर पडली आहे. शुक्रवारी सकाळी समाजवादी पक्षाचे फैजाबाद (अयोध्या) मतदारसंघातील खासदार अवधेश प्रसाद, डिम्पल यादव आदींनी मधल्या मोकळ्या जागेत तीन-चार दानपेट्या आणून ठेवल्या. जमलेल्या विरोधी खासदारांना प्रतिकात्मक दान देण्याचे आवाहन केले गेले. तोपर्यंत पुजाऱ्याच्या वेशात खासदार पप्पू यादव दानपेट्यांच्या शेजारी येऊन बसले. त्यांनीही दानपेट्यांमध्ये दान टाकले. तिथे उपस्थित इतर खासदारांनी दान दिले, हे पाहून राहुल गांधीही पुढे आले. त्यांनीही पप्पू यादव यांना नमस्कार करत दानपेटीत दान टाकले. या नाट्याची अखेर ‘पुजारी’ पप्पू यादव यांनी दानपेटीची ‘चोरी’ करण्यात झाली. पप्पू यादव यांनी दानपेटी घेऊन पळण्याचे नाटक केले आणि काही खासदारांनी त्यांना पकडण्याचे! हे सगळे नाट्य सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी-वढेरा आदी नेतेही उपस्थित होते.

हिंदू धर्माचा अपमान, भाजपचा आरोप

विरोधी पक्षांच्या खासदारांनी दानपेटीच्या चोरीचा असा ‘नाट्यप्रयोग’ करून केंद्र सरकार आणि अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टींविरोधात उपहासात्मक टीका केली. अशा उपहासातून विरोधी खासदारांनी हिंदू धर्माचा, संतांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केला. त्यावर, आम्ही कोणाचाही अपमान केलेला नाही. रामाबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे, असे सपच्या खासदारांनी सांगितले.

कोट मतांसाठी ज्यांनी सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जनता धडा शिकवेल, त्यांना कधीही माफ करणार नाही. – गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री

केंद्र सरकारने स्पष्ट केले पाहिजे की, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काय कारवाई केली. या प्रकरणाला आता दोन महिन्यांचा काळ होत आला आहे. – धर्मेंद्र यादव, खासदार, सप