Ram Temple theft row investigation reveals shocking details as CCTV : अयोध्या येथील राम मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये, दान केलेल्या निधीच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी किमान पाच जण पैशांची मोजणी करताना नोटा लपवत असल्याचं समोर आलं आहे. अयोध्या पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पिलग्रिम फॅसिलिटी सेंटरमधील (Pilgrim Facility Centre) ४५ दिवसांच्या फुटेजची कसून तपासणी केल्यावर, पैशांची मोजणी करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनी नोटांचे बंडल काढून ते स्वतःच्या कपड्यांमध्ये किंवा सॉक्समध्ये लपवल्याचं उघड झालं. दरम्यान, ज्या एजन्सीमार्फत या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्या एजन्सीने या कर्मचाऱ्यांची निवड आपण केली नसल्याचा दावा केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आतापर्यंत ८० लाख रुपये हस्तगत

ज्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देणगीची रक्कम जमा केली जात होती, त्याच बँकेने या नियुक्त्यांसाठी या नावांची शिफारस केल्याचं एजन्सीचं म्हणणं आहे. सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांनी देणगीचे पैसे चोरताना दिसलेल्या आरोपींच्या ठिकाणांवर आधीच छापे टाकून रोख रक्कम जप्त केली असून, आतापर्यंत पोलिसांच्या पथकाने सुमारे ८० लाख रुपये हस्तगत केले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या तक्रारीवरून पोलिसांनी २५ जून रोजी एफआयआर (FIR) नोंदवून अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, मनिष कुमार यादव, करुनेश पांडे, रामशकंर मिश्रा, टिनू यादव आणि सुभाष श्रीवास्तव या आठ जणांना अटक केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय?

टिनू यादव हे ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांचे माजी वाहनचालक असून मनिष यादव हा टिनू यांचा पुतण्या आहे. अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुल्का आणि मनिष यादव यांच्याशी संबंधित ठिकाणांवरून रोख रक्कम जप्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मंदिरात विविध दानपेट्यांमध्ये जमा झालेले पैसे मोजण्यासाठी ट्रस्टने सुमारे ५० लोकांना कामावर ठेवले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “पैशांची मोजणी सुरू असताना पाच व्यक्ती पैशांच्या ढिगातून नोटांचं बंडल लंपास करताना, कपड्यांमध्ये लपवताना किंवा सॉक्समध्ये कोंबताना स्पष्ट दिसत आहेत. या व्यक्तींच्या मालमत्तांवर केलेल्या छाप्यातून आधीच पैसे जप्त करण्यात आले आहेत. दुर्दैवाने, मंदिर प्रशासन ४५ दिवसांपेक्षा जास्त जुने सीसीटीव्ही फुटेज जतन करत नाही. त्यामुळे हा प्रकार नक्की किती काळापासून सुरू होता, हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही.”

एजन्सीकडून हाऊसकीपिंगसाठी कर्मचारी पुरवले

चोरीच्या पैशांमधून कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी केली आहे का, हे तपासण्यासाठी पोलीस आता आरोपींशी संबंधित ठिकाणांवरून जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी करत आहेत, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. “आम्ही देणगीचे पैसे लांबवण्याच्या इतर मार्गांचाही शोध घेत आहोत. अगदी बँकेचे कर्मचारीही आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत”, असंही अधिकारी म्हणाले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी सहा जणांची नियुक्ती स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) वाराणसीस्थित सैनिक सिक्युरिटीज या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीमार्फत केली होती. सैनिक सिक्युरिटीजचे संचालक गौरव सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, त्यांची एजन्सी बँक व इतर संस्थांना केवळ हाऊसकीपिंग कर्मचारी पुरवते. आम्ही बँकेशी संबंधित कर्मचारी पुरवत नाही, तर हाऊसकीपिंग कर्मचारी देतो. बँक किंवा संबंधित फर्म त्या कर्मचाऱ्यांचा वापर कशासाठी करते, हे त्यांच्यावर अवलंबून असतं”, असं ते म्हणाले.

राम मंदिरातील कामासाठी मनुष्यबळ निवडण्याचे कोणतेही स्वातंत्र्य आपल्या एजन्सीला नव्हते, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “या प्रकरणात एसबीआयनेच आम्हाला कामावर ठेवण्यासाठी लोकांची नावे दिली होती. आम्ही त्यांचे आधार कार्ड तपासून त्यांची पात्रता पडताळली आणि कागदपत्रांची पूर्तता केली. या माणसांनी यापूर्वी कधीही आमच्याकडे काम केलेलं नाही”, अशी माहिती सिंग यांनी दिली. तसंच, या संदर्भातील सर्व कागदोपत्री पुरावे प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला सादर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्व कर्मचारी एकमेकांचे नातेवाईक

या गोष्टीला दुजोरा देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “हे प्रकरण दर्शवतं की मंदिर प्रशासनाचा कारभार तदर्थ (ad-hoc) पद्धतीने चालवला जात होता. SIT च्या अहवालातही यावर बोट ठेवण्यात आले आहे. अनेक आरोपी एकमेकांचे किंवा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक आहेत. आरोपींशिवाय मोठ्या संख्येने नियुक्त करण्यात आलेले पैशांची मोजणी करणारे कर्मचारीही तदर्थ (ad-hoc) पद्धतीनेच नेमले गेले होते, कारण कोणीतरी कोणाचा तरी ओळखीचा होता. अशा नियुक्त्यांपूर्वी व्यक्तींची कोणतीही योग्य पडताळणी केली गेली नाही, तसंच मोजणी कक्षातील प्रवेश नियंत्रण देखील योग्य तपासणी आणि झडती घेण्याइतके मजबूत नव्हते.”

या अधिकाऱ्याने पुढे सांगितलं की, बँकेचे अधिकारीही आता चौकशीच्या फेऱ्यात आहेत. काही संशयितांची नियुक्ती ज्या व्हेंडरमार्फत करण्यात आली होती, त्यावरून इंडियन एक्स्प्रेसने एसबीआयला पाठवलेल्या प्रश्नावलीला बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.