केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी अचानक आपल्या मंत्रालयातील विविध विभागांचा दौरा करून तेथील स्वच्छतेसंबंधी पाहणी केली. त्या वेळी तेथे आढळलेल्या अस्वच्छतेबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. काही खोल्यांमधील विद्युततारा लोंबकळत होत्या, तर वाचनालयातील पुस्तकांचा तपशीलही योग्य रीतीने ठेवण्यात आला नसल्याचे पासवान यांना आढळले.
पासवान यांनी अन्नमंत्रालयातील विविध विभागांचा दौरा केला. वाचनालये, भोजनालय, स्वच्छतागृहे आदी ठिकाणी त्यांनी पाहणी केल्यावर तेथील एकूण परिस्थिती बघून ते कमालीचे नाराज झाले, असे सरकारी निवेदनामध्ये म्हटले आहे.
पासवान यांनी स्वत: एका ठिकाणी पडलेला खराब कागद उचलून कचराकुंडीत फेकून दिला, तसेच वाचनालयाचे नूतनीकरण करण्याचे आदेश दिले. जुने दस्तावेज वेगाने निकाली काढण्याच्याही सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विविध अधिकारी, कर्मचारी व अन्य कामगारांशी संवाद साधून पासवान यांनी स्वच्छतेचे महत्त्व सर्वाना सांगितले.