भाजप हा आमचा ज्येष्ठ बंधू आहे आणि बिहारमधील आगामी निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यात येतील, असे लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांनी म्हटले आहे.
एनडीएमध्ये जागावाटप हा मुद्दा गौण आहे, आमच्या पक्षाला किती जागा मिळतील त्याची आम्हाला फिकीर नाही, बिहारमधील विद्यमान सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे पासवान म्हणाले.
रामविलास पासवान जास्त जागांसाठी अडून बसले असे कोणीही म्हणू शकणार नाही. किती किंवा कोणत्या जागांवर कोणता पक्ष लढतो हा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यावर भाजप, लोकजनशक्ती पार्टी आणि आरएलएसपी यांच्या बैठकीत निर्णय होईल. जद(यू) सरकारला सत्तेवरून खाली खेचणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असेही पासवान म्हणाले.
बिहारमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांना किंवा अन्य उमेदवाराला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारणार का, असे विचारले असता पासवान म्हणाले की, निवडणुका जाहीर झाल्यावर याबाबत चर्चा होईल. भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, मोदी यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढल्या जातील, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि हरयाणात निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली, त्याप्रमाणे बिहारमध्येही केली जाईल आणि मोदी त्याचा निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.