Ramalinga Reddy : सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर डी.के.शिवकुमार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची ३ जून रोजी शपथ घेतली होती. त्यांच्याबरोबर १२ जणांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. मात्र, शपथविधीनंतर दोन दिवसांनी कर्नाटकच्या राजकारणात नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची रामलिंगा रेड्डी यांनी शपथ घेतली होती. पण शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशीच नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट कॅबिनेट मंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आज (६ जून) रामलिंगा रेड्डी यांनी त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मागे घेतला आहे.
काँग्रेसचे नेते तथा कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढली आहे. त्यानंतर अखेर रामलिंगा रेड्डी यांनी आपला राजीनामा अधिकृतपणे मागे घेतला आहे. कर्नाटक काँग्रेस पक्षांतील मतभेद मिटवण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर रेड्डी यांनी राजीनामा मागे घेतला आहे. या संदर्भातील माहिती रणदीप सुरजेवाला यांनी माध्यमांना दिली आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी काय म्हटलं?
“रामलिंगा रेड्डी हे काँग्रेस पक्षासाठी खूप महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा अनुभव पक्षासाठी अनमोल आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांचा काही गैरसमज झाला होता. मात्र, आम्ही चर्चा केल्यानंतर आता त्यांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला आहे. रामलिंगा रेड्डी हे पक्षाचे निष्ठावान नेते आहेत आणि आता ते मंत्री म्हणून आपलं काम सुरू ठेवतील. खरं तर भाजपाला धक्का बसला असेल, कारण त्यांना वाटलं होतं की ते सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अडथळा आणू शकतील. पण तसं झालं नाही”, असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.
रामलिंगा रेड्डींनी काय आरोप केले होते?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी यांनी मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना रामलिंगा रेड्डी यांनी खातेवाटपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. रेड्डी यांनी आरोप केला होता की, “मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी मंत्रिपदाबाबत दिलेल्या आश्वासनावरून आता ‘यू-टर्न’ घेतला आहे. डी.के.शिवकुमार यांनी मला ते मुख्यमंत्री झाल्यानंतर नगरविकास खातं देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, माझा वारंवार अपमान होत आहे. आता मला हे सहन होत नाही. मी काँग्रेसचा आमदार म्हणून कायम राहील”, असं रामलिंगा रेड्डी यांनी म्हटलं होतं.
#WATCH | Bengaluru | Ramalinga Reddy resigns as Karnataka Minister, says, "I am still in the Congress party; I have not resigned from the party. I have been in the Congress party for the past 53 years. I have handled several responsibilities within the party.I have served as a… pic.twitter.com/5SnASNSpJl
— ANI (@ANI) June 5, 2026
रामलिंगा रेड्डींनी राजीनामा का दिला होता?
मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात ७२ वर्षीय रामलिंगा रेड्डी यांची गुरुवारी जलसंपदा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, रामलिंगा रेड्डी यांनी मागणी केलेलं नगरविकास खातं कृष्णा बायरे गौडा यांना देण्यात आलं होतं. त्यामुळे रामलिंगा रेड्डी यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार काय म्हणाले होते?
रामलिंगा रेड्डी यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. रामलिंगा रेड्डी यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री डी.के.शिवकुमार म्हणाले होते की, “काळजी करण्यासारखं काही नाही. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही मंत्रिमंडळातील सर्वात जवळचे मित्र आहोत. आम्ही हा प्रश्न चर्चा करून सोडवू. त्यांनी मला दुसरं कोणतंही मंत्रिपद देण्यास सांगितलं आहे. आता रामलिंगा रेड्डी यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि सर्व काही ठीक होईल”, असं म्हणत डी.के.शिवकुमार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
रामलिंगा रेड्डी कोण आहेत?
रामलिंगा रेड्डी हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. रामलिंगा रेड्डी तब्बल आठ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तसेच सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. गृहमंत्री, परिवहन खात्यासह आदी महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी याआधी सांभाळलेली आहे.
कर्नाटकच्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश?
डी.के.शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात जी.परमेश्वर, यतींद्र सिद्धरामय्या (सिद्धरामय्या यांचे पुत्र), प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र), के.एच.मुनियप्पा, के.जे.जॉर्ज, रामलिंगा रेड्डी, एम.बी.पाटील, सतीश जारकीहोळी, कृष्ण बायरेगौड़ा, यू.टी. खादर, ईश्वर खांद्रे, बायराथी सुरेश आणि शरणप्रकाश पाटील यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
कर्नाटकात नेतृत्व बदल का?
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ३ जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून डी.के.शिवकुमार यांनी शपथ घेतली. डी.के.शिवकुमार हे त्यांच्या राजकीय कौशल्यासाठी आणि अडचणीच्या काळात धावून येणारे नेते म्हणून ओळखले जातात. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका २०२८ मध्ये होणार आहेत. दुसरीकडे देशभरात भाजपाचा प्रभाव वाढत आहे. कर्नाटकात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढील परिस्थितीचा विचार करून कर्नाटकात नेतृत्व बदल केल्याचं बोललं जात आहे.
