मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत इंडिया आघाडी, कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज देखील काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.
तसेच कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनेही दिल्लीसह देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘कितीही निदर्शने केली तरी ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत’, असं रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच रामदास आठवले यांनी अभिजीत दिपके यांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे.
CJP च्या निदर्शनांबाबत आठवले काय म्हणाले?
सीजेपीच्यावतीने दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सीजेपीच्या निदर्शनांबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “अराजकता पसरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, अभिजीत दिपके यांना माझं आवाहन आहे की, सतत निदर्शने करणं हा योग्य मार्ग नाही. तुम्ही एक दिवस निदर्शन केलं. पुन्हा दुसऱ्या दिवशीही निदर्शन केलं. मात्र, तुम्ही कितीही निदर्शने केले तरी ज्ञानेश कुमार राजीनामा देणार नाहीत”, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
इंडिया आघाडीबाबत आठवले काय म्हणाले?
इंडिया आघाडीच्यावतीने सर्वोच्च न्यायालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, “वस्तुस्थिती अशी आहे की इंडिया आघाडीसमोर फक्त मोर्चे काढण्याचं काम शिल्लक राहिलेलं आहे. त्यांना देशासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही. पण आमचं देशाच्या विकासासाठी अविरतपणे काम सुरू आहे. विरोधकांना शांततापूर्ण रॅली काढण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, सतत रॅली काढणं योग्य नाही. राहुल गांधी यांचं आणि इंडिया आघाडीचं जे आंदोलन आहे ते लोकांना मुद्दाम त्रास देण्यासाठी सुरू आहे असं मला वाटतं”, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.
इंडिया आघाडीच्या मोर्चाबाबत फडणवीस काय म्हणाले?
राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत मोर्चा काढला आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस पक्षाने जे काही चालवलं आहे ते पूर्णपणे संविधान विरोधी आहे. संविधान हातात घ्यायचं आणि संविधानाने निर्माण झालेल्या संस्थांना बदनाम करणं सुरू आहे. सर्वोच्च न्यायालय, आरबीआय अशा संस्था कुचकामी आहेत असं दाखवायचं, लोकांना त्या विरोधात भडकवायचं. आता संविधान बदलावं लागेल हे शेवटी सांगायचं. अति डावी विचारसरणी यांना प्रस्थापित करण्याचं हे षडयंत्र आहे. भारताचं संविधान नाकारण्याचं काम राहुल गांधी आणि इंडी आघाडीने केलं आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढू आणि सरन्यायाधीशांनी आमची भेट घेतली पाहिजे आणि निवेदन घेतलं पाहिजे. मला सांगा हे कुठल्या संविधानात लिहिलं आहे?”, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
