मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरसह आणखी काही निर्णय कथित मनमानीपणे घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. यावरून ज्ञानेश कुमार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत थेट देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याच्या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर जोरदार टीका केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं नाव बदलून ‘राजीनामा जनता पार्टी’ असं ठेवलं पाहिजे, अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी दिपके यांच्यावर केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
रामदास आठवले काय म्हणाले?
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या विरोधक आक्रमक झाले आहेत. भारतीय निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
“कॉक्रोच जनता पार्टीने आपलं नाव बदलून ‘राजीनामा जनता पार्टी’ असं ठेवावं”, अशा शब्दांत मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी त्यांच्यावर ही टीका केली आहे.
दरम्यान, जुलैमध्ये नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या अनुषंगाने बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, “कॉक्रोच जनता पार्टी फक्त आणि फक्त राजीनाम्यांचीच मागणी करत असते. त्यामुळे सीजेपीने आपलं नाव बदलून ‘राजीनामा जनता पार्टी’ असं ठेवावं.”
दिपकेंचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “ज्ञानेश कुमार हे देशातील सर्वांत मोठे देशद्रोही असून त्यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे,” असा गंभीर आरोप करत दिपके यांनी त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. दिपके यांनी म्हटलं की, ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून देशात कोणी मतदान करायचे आणि कोणी नाही, हे ते स्वतः ठरवत आहेत. ही कसली लोकशाही? त्यांनी संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच कोलमडवून टाकली आहे,” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
