मोदी सरकार ड्रग्जसंदर्भातील कायद्यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत; रामदास आठवलेंचा खुलासा

रामदास आठवले यांनी पत्रकारांशी चर्चा करता यासंदर्भातील सविस्तर भूमिका स्पष्ट करत मंत्रालयाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या चर्चेची माहिती दिली

drugs case
पत्रकारांशी संवाद सधाताना आठवलेंनी केलं भाष्य (प्रातिनिधिक फोटो)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असं मत मांडलं आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला तुरुंगात आपण टाकत नाही त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे अशा पद्धतीने विधान करीत ड्रग्स घेणाऱ्याच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा खुलासा देखील या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

“आमच्या मंत्रालयाचं म्हणणं आहे की, दारु पिणाऱ्याला, सिगारेट पिणाऱ्याला, बिडी पिणाऱ्याला आपण तुरुंगात टाकत नाही. ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगामध्ये न टाकता नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी नशामुक्ती केंद्र उपयुक्त आहे. म्हणून सध्या जो कायदा आहे ज्यात ड्रग्ज घेतलेल्याला तुरुंगात टाकलं जातं त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा विचार आमचं मंत्रालय करत आहे. लवकरच त्यासंबंधीचा कायदा जर झाला तर ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात न पाठवात नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात येईल,” असं आठवले यांनी म्हटलं आहे. दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी लोकार्पण सोहळ्यादरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना अमलीपदार्थांसदर्भातील कायदा बदलण्याचा विचार सुरु असल्याबद्दल भाष्य केलं.

ड्रग्स पार्टी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या व्यक्तिगत आरोपांचा देखील रामदास आठवले यांनी समाचार घेतला. यावेळी आठवले यांनी मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ससंदर्भात आरोप करावेत परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नये असं म्हटलं. तसेच नवाब मलिक हे सामील असलेल सरकार हे ड्रगला पाठिंबा देणार सरकार आहे. समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी आठवले यांनी केला आहे.

“मला वाटतं समीर वानखेडे हे दलित आहेत. त्यांनी ड्रग्जमुक्त मुंबईची मोहीम हाती घेतलीय. त्याचसंदर्भात त्यांनी कारवाई केलीय. यात त्यांचा कोणताही व्यक्तिगत फायदा नाहीय. जे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातून समीर वानखेडेंना, एनसीबीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भारत सरकार सांगतंय असा काही विषय नाहीय. समीर वानखेडेला थोडी आम्ही सांगतिलं होतं. पुराव्यांच्या आधारे क्रुझवर छापा टाकून १९ जणांना अटक केली. २२ दिवस जामीन मिळाला नाही म्हणजे एनसीबीकडे मोठे पुरावे होते, असा याचा अर्थ आहे,” असं आठवले म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ramdas athawale says government is thinking to change the drugs related law scsg

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या