Shiv Sena Split:शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआय (ए) प्रमुख रामदास आठवले यांनी जोरदार पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरे यांना आता स्वतःचे आमदार आणि खासदार सांभाळणे कठीण झाले आहे, कारण त्यांनी २०१९ मध्येच एक मोठी राजकीय चूक केली होती,” असा टोला आठवलेंनी लगावला. नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील महायुती आणि दिल्लीतील एनडीएच्या (NDA) वाढत्या ताकदीवर मोठे विधान केले.

‘…तर उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री झाले असते’

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले, “२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणे आवश्यक होते. जर त्यांनी तसे केले असते, तर ते स्वतः उपमुख्यमंत्री होऊ शकले असते. मात्र, त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे.”

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, शिवसेनेच्या ९ पैकी ६ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीची आणि केंद्रात एनडीएची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला खिंडार? आठवलेंचा मोठा दावा

देशातील राजकीय समीकरणांवर बोलताना रामदास आठवले यांनी विरोधकांच्या आघाडीत बिघाडी झाल्याचा दावा केला. “आता एक खूप चांगली गोष्ट घडली आहे; द्रमुकने (DMK) काँग्रेससोबतची आपली आघाडी तोडली आहे. एवढेच नाही तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे (TMC) अनेक खासदार आमच्यासोबत आले आहेत, आणि आम आदमी पक्षाचे (AAP) लोकसभा सदस्यही लवकरच आमच्यासोबत येऊ शकतात,” असा खळबळजनक दावा आठवलेंनी केला आहे.

महिला आरक्षणाबाबत मोदी सरकारचा मोठा प्लॅन

केंद्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकताना आठवले म्हणाले की, मोदी सरकार महिला आरक्षणाशी संबंधित (नारी शक्ती वंदन अधिनियम), ‘मतदारसंघ पुनर्रचना विधेयक’ संसदेत मंजूर करणार आहे. हे विधेयक निश्चितपणे मंजूर होईल आणि यावेळी संसदेत आमच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत असेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.