दिल्लीत जंतर-मंतरवर ३७ दिवस आंदोलन केलं. या आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची. २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि हे आंदोलन संपलं आहे. या आंदोलनात CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात तरुणाई रस्त्यावर उतरली होती. विरोधात असलेल्या राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. दरम्यान या आंदोलनात जी अर्वाच्य भाषा वापरली गेली त्यावर योगगुरू रामदेवबाबांनी टीका केली आहे. जेन झीने भारताची संस्कृती बदनाम केली असं त्यांनी म्हटलं आहे.
रामदेवबाबा काय म्हणाले?
“देश रस्त्यावर चालणार नाही, तो संसदेतच चालणार. शिक्षण मंत्री कोण असेल आणि कोण नाही ते रस्त्यावर ठरणार नाही. देशाचे पंतप्रधान आणि देशाची संसद ते ठरवेल. काही लोकांनी आझादीचे नारे दिले, ब्राह्मणवादसे आझादी, आरएसएससे आझादी. जर एखाद्या माणसाने ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतला आहे आणि त्याने राष्ट्रवाद संघाकडून शिकला आहे तर तुमच्या का पोटात दुखतं? संविधानाने दलित, शोषित वंचितांना जे अधिकार दिलेत तेच अधिकार ब्राह्मणांनाही दिले आहेत. त्यामुळे ब्राह्मणवाद म्हणत शिव्या देणं चुकीचं आहे. सनातन विरोधी लोकांनी आमच्यावर लांछन लावलं आहे, पण तसं मुळीच नाही. उगाच अफवा पसरवल्या जात आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही कुणाचीही जात-पात न पाहता दिक्षा दिली आहे. महिला आणि पुरुष यज्ञोपावित धारण करत आहेत. वेद पठण करत आहेत. त्यांना त्यांची जात आम्ही विचारलेली नाही. हा नवा भारत आहे, ज्यात सगळे जानवी घालत आहेत आणि भेदभाव न करता आम्ही पुढे जात आहोत.” असंही रामदेवबाबा म्हणाले.
जंतरमंतरवर जेन झीने एकत्र येऊन भारताला बदनाम केलं-रामदेवबाबा
रामदेवबाबा पुढे म्हणाले, “आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत, सगळ्यांचा डीएनए एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर जेन झीने एकत्र येत भारताला बदनाम केलं. शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती नाही. आपण कायम सगळ्यांना आदर देऊन पुढे गेलो आहोत. मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे. ज्या काही असहमती असतील त्या संवैधिनिक पद्धतीने चर्चा करुन ठरवल्या पाहिजे. विरोध करायचा असेल तरी तो विवेकपूर्ण विरोध असला पाहिजे.” आता रामदेवबाबांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरुन CJP चे प्रवक्ते किंवा अभिजीत दिपके काही उत्तर देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
