योगगुरु म्हणून ओळखले जाणारे रामदेव बाबा आता पतंजलीच्या उत्पादनांमुळे ओळखले जातात. काळा पैसा, भ्रष्टाचार याविषयी पोटतिडकीने बोलणारे, प्रसंगी त्यासाठी आंदोलन करणारे रामदेव बाबा आता मात्र फक्त पतंजलीच्या उत्पादनांविषयी बोलताना दिसतात. साबणापासून ते तेलापर्यंत आणि मिठापासून ते अगदी दंत मंजनापर्यंतच्या जाहिरातीत बाबा रामदेव पाहायला मिळतात. मोदी सरकार तिसरा वर्धापनदिन साजरा करताना देशाची भरभराट झाल्याचा दावा करत आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये रामदेव बाबा यांच्या पतंजलीची मोठी भरभराट झाली आहे. मोदींच्या राज्यारोहणाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत रामदेव बाबा यांची मोठी भरभराट झाल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. 'अॅज मोदी अँड हिज हिंदू बेस राईज, सो टू डज योगा टायकून बाबा रामदेव' या वृत्तानुसार मोदी सत्तेत आल्यानंतरच्या तीन वर्षांमध्ये भाजपशासित राज्यांमध्ये रामदेव बाबांच्या पतंजलीला जमीन अधिग्रहणात जवळपास ३०० कोटींची सूट मिळाली आहे. भाजप सत्तेत आला, त्यावेळी पतंजलीची उलाढाल १५६ मिलियन अमेरिकन डॉलर इतकी होती. यानंतर २०१५ मध्ये पतंजलीची वार्षिक उलाढाल ३२२ मिलियन अमेरिकन डॉलरवर जाऊन पोहोचली. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात पतंजलीचा महसूल १.६ बिलियन अमेरिकन डॉलरवर गेल्याचे खुद्द रामदेव बाबा यांनीच सांगितले आहे. यासोबतच मोदींच्या राजवटीत पतंजलीने तब्बल २ हजार एकर जमीन खरेदी केली आहे. रामदेव बाबा यांची भरभराट नेमकी कशी होत गेली, हे जाणून घ्यायचे असेल, तर तीन वर्षांपूर्वीची स्थिती डोळ्यासमोर आणावी लागेल. नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा तीन वर्षांपूर्वी एका सभेत एकत्र होते. २३ मार्च २०१४ रोजी मोदींची एक सभा होती. त्यावेळी मोदींसह रामदेव बाबा व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबा मोदींच्या कानात काहीतरी कुजबुजले. यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी उपस्थितांना मोदींना मतदान करण्याचे आवाहन केले. यानंतर देशात भाजपची सत्ता आली आणि पतंजलीची मोठी भरभराट झाली.