आंदोलनात लहान मुलांना आणि तरुणांना ओढलं गेलं तर ते शिकणार कधी? असा सवाल योगगुरु रामदेवबाबांनी केला आहे. त्यांनी रायपूर या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. रामदेवबाबा यांनी म्हटलं आहे की देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ब्राह्मण, दलित कुणालाही कसला धोका नाही. धोका असलाच तर तो देशातल्या लहान मुलांना आणि तरुणांना आहे कारण त्यांना आंदोलनात ओढलं जातं आहे.

लहान मुलं आंदोलनात आली तर ती शिकणार कधी?

देशात ना हिंदू धोक्यात आहे, ना मुस्लिम, ना शिख, ना ख्रिश्चन कुणीही धोक्यात नाही. ब्राह्मण समुदाय असो, दलित असो, आदिवासी असो कुणीही धोक्यात नाही. कुणाला धोका असेलच तर तो देशातल्या लहान मुलांना, तरुणांना. आज देशापुढे सर्वात मोठा मुद्दा कुठला असेल तर तो देशातील लहान आणि तरुण मुलांचा. कारण काही लोक या तरुणाईचा उपयोग आंदोलनासाठी करत आहेत. जर देशातल्या मुलांना जे प्राथमिक शाळेत शिकत आहेत त्यांना जर आंदोलनात ढकललं तर ते शिकणार कधी? आंदोलन काय ते माहीत नाही अशा मुलांना आंदोलनात आणलं गेलं त्यांना सांगितलं गेलं की घेराव घाला, आंदोलन करा, घोषणा करा तर ते शिकणार कधी? लहान मुलांना आंदोलनात आणणं योग्य नाही. असं उदाहरण जगात कुठेही नाही, असं रामदेवबाबा यांनी म्हटलं आहे.

लहान मुलांना आंदोलनात ओढून काय होणार आहे?

आंदोलन करणं हे पालकांचं काम आहे. लहान मुलांना आंदोलनात का ओढलं जातं आहे? देशात मानवी मूल्यांवर आधारित आंदोलन झालं पाहिजे, संविधानाला अनुसरुन आंदोलन झालं पाहिजे तसं झालं तर मी त्याला पाठिंबाच देईन. पण आंदोलनाच्या नावाखाली अराजकता पसरवणं गैर आहे. तसंच लहान मुलांना आंदोलनात आणणं योग्य नाही. देशाच्या शिक्षण धोरणाबाबत गहिरे प्रश्न आहेत, हे मला मान्य आहे. त्यावर उपाय योजले गेले पाहिजेत यात काही शंकाच नाही. सामाजिक जागरुकता, राजकीय जागरुकता आणि प्रशासकीय जागरुकता देशात आली पाहिजे. त्यामुळे देशासमोरचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मदत होईल असंही रामदेवबाबांनी म्हटलं आहे.

जुलै महिन्यातही जेन झीवर रामदेवबाबांची टीका

“आपल्या सगळ्यांचे पूर्वज एक आहेत, सगळ्यांचा डीएनए एक आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जंतरमंतरवर जेन झीने एकत्र येत भारताला बदनाम केलं. शिवीगाळ करणं ही आपली संस्कृती नाही. आपण कायम सगळ्यांना आदर देऊन पुढे गेलो आहोत. मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे. ज्या काही असहमती असतील त्या संवैधिनिक पद्धतीने चर्चा करुन ठरवल्या पाहिजे. विरोध करायचा असेल तरी तो विवेकपूर्ण विरोध असला पाहिजे.” असं वक्तव्य रामदेवबाबांनी जुलै महिन्यात केलं होतं.