वृत्तसंस्था, बंगळुरू : “एका दलित व्यक्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काय देणेघणे आहे,” असा प्रश्न भाजपचे कर्नाटकातील खासदार रमेश जिगाजिनगी यांनी कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांना उद्देशून विचारल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. संघाने नोंदणी करावी, असे आवाहन खरगे यांनी गेल्या काही दिवसांत वारंवार केले आहे. त्यांनी बुधवारी संघाचा कायदेशीर दर्जा आणि पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित केले. त्यावरून जिगाजिनगी यांनी खरगे यांना लक्ष्य केले.
जिगाजिनगी यांच्या वक्तव्याला उत्तर देताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असल्याबद्दल आपल्याला कोणाचीही भीती वाटत नाही, असे प्रियांक खरगे म्हणाले. जिगाजिनगी यांनी विचारलेल्या प्रश्नाचा अनेक पैलूंनी तपास करणे आवश्यक आहे, असेही खरगे म्हणाले. “दलित समुदायातील असलेल्या जिगाजिनगी यांना संघाच्या आतील वर्तुळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी वैफल्यातून हे विधान केले आहे का,” असा प्रश्नही खरगे यांनी विचारला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नोंदणी करायला सांगणे हे खरगे यांचे काम आहे का? ते केवळ संघाच्या मागे लागले आहेत. संघाला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही सुटका होत नाही.- रमेश जिगाजिनगी, भाजप खासदार
हा दलितांना सामाजिक उतरंडीच्या मूलभूत तत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्या संघाशी संबंध न ठेवण्यासंबंधी सावधगिरीचा इशारा आहे का? स्वतःला सामाजिक पातळीवर श्रेष्ठ समजणाऱ्यांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघाला प्रश्न विचारण्याचा दलितांना अधिकार नाही का? – प्रियांक खरगे, गृहमंत्री, कर्नाटक
