Ramlila arrow accident UP case: रामलीलाच्या सादरीकरणादरम्यान रामाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने सोडलेला बाण रावणाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या डोळ्यात घुसला. यात रावणाची भूमिका करणारा अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी रामाची भूमिका करणारा अभिनेता आणि रामलीलाचा आयोजक यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नेम चुकला अन् डोळ्यात घुसला बाण
शाहगंज येथे १३ नोव्हेंबर २०२५ रोजी रामलीला नाटकाचे रामसानेही सिंह यांनी आयोजन केले होते. या नाटकात सुनील कुमार रावणाची भूमिका करत होते तर, नैतिक पांडे रामाच्या भूमिकेत होते. नाटकात राम आणि रावणाच्या युद्धाचा प्रसंग दाखविण्यात आला. यावेळी रामाच्या भूमिकेत असलेल्या पांडे यांनी सोडलेला बाण चुकून सुनील कुमार यांच्या डोळ्यात घुसला. या बाणाचा मुकूटाला स्पर्श होणे अपेक्षित होते.
मदत मिळाली नाही
पांडे यांचा नेम चुकला आणि त्यांनी सोडलेला बाण सुनील कुमार यांच्या डोळ्यात घुसला. यामुळे कुमार गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. गंभीर जखमी झाल्यानंतरही सहअभिनेता किंवा आयोजकाने मदत केली नाही, असा आरोप कुमार यांनी २३ जानेवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. वैद्यकीय आणि आर्थिक मदत देण्यासह आयोजकाने नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अपमानास्पद वागणूक
घटनेच्या दुसऱ्या दिवशी आयोजकाकडे मदत मागण्यासाठी कुटुंबीय गेले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप पांडे यांनी केला, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. वैद्यकीय मदत मागण्यासाठी आयोजकाच्या घरी गेल्यावर त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, आणि घरातून बाहेर काढले, असेही तक्रारीत म्हटले आहे.
अखेर पोलिसांनी घेतली दखल
सुनील कुमार यांनी पोलिसांना संपर्क करुन मदत मागितली पण, त्यांच्याकडून देखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आता शाहगंज पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आयोजक रामसानेही सिंह आणि अभिनेता नैतिक पांडे यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

