Ramnath Goenka Journalism Awards : पत्रकारितेतील अतुलनीय कामगिरीबद्दल दरवर्षी रामनाथ गोएंका फाऊंडेशनकडून पत्रकारांना सन्माननीत केलं जातं. या पार्श्वभूमीवरच आज दिल्लीत उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळा पार पडत आहे.

भूस्खलनानंतरच्या बचावकार्याची वस्तुस्थिती मांडणाऱ्या वृत्तांतापासून राजस्थानमधील आदिवासी कुटुंबातील लहान बालकांच्या तस्करीचा माग घेणाऱ्या शोधक बातमीपर्यंत आणि देशातील सरोगसीच्या बाजारापासून पुण्याच्या कंटोन्मेंट परिसरातील ब्रिटिशकालीन बंगल्यांच्या बेकायदा विक्रीचे प्रकरण उजेडात आणणाऱ्या पत्रकारितेचा आज नवी दिल्लीत ‘रामनाथ गोएंका एक्सिलन्स इन जर्नलिझम’पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येत आहे.

देशातील पत्रकारितेत गौरवास्पद समजल्या जाणाऱ्या ‘रामनाथ गोएंका एक्सिलन्स इन जर्नलिझम’ पुरस्कार सोहळ्यात २०२४ साली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना सन्मानित करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांची या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती आहे.

रामनाथ गोएंका फाऊंडेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे यंदा हे २० वे वर्ष आहे. शोधपत्रकारिता, राजकारण आणि प्रशासन वार्तांकन, लेख, साहित्य, क्रीडा आणि प्रादेशिक भाषांतील पत्रकारिता अशा वर्गात हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन.श्रीकृष्ण, ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटीचे संस्थापक कुलगुरू प्रा.सी.राज कुमार, इंडिया हॅबिटॅट सेंटरचे संचालक प्रा.के.जी.सुरेश,’एक स्टेप’च्या संचालिका रोहिणी निलेकणी आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ.एस.वाय कुरेशी यांच्या निवड समितीने देशभरातून आलेल्या अर्जामधून सर्वोत्तम पत्रकारांची पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.