उत्तर प्रदेशातील रामपूर येथे आईच्या दुसऱ्या लग्नाला विरोध असल्यामुळे, न्युझीलंडवरून थेट भारतात येऊन आपल्या सावत्र वडिलांची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मृताच्या पत्नीचा मुलगा अवदीप सिंग (वय २२) आणि त्याचा नातेवाईक राजनदीप सिंग (वय २३) या दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
आईच्या दुसऱ्या लग्नाला विरोध
नवज्योत सिंग (२५) याने पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जानेवारी महिन्यात कमल कौर (४९) या विधवेशी विवाह केला होता. कमल कौर यांचे दोन्ही मुलगे अवदीप आणि जोगनप्रीत हे वडिलांच्या मृत्यूनंतर सुमारे तीन वर्षांपूर्वी न्युझीलंडवरूनला गेले होते. नवज्योतसोबतच्या आईच्या लग्नाला त्यांचा विरोध असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वादावर तोडगा काढण्यासाठी पंचायतही बोलावण्यात आली होती. नवज्योतला यापूर्वी धमक्या देण्यात आल्याचा दावा त्याच्या नातेवाईकाने केला आहे.
कार सर्व्हिस सेंटरमध्ये गोळीबार
शनिवारी संध्याकाळी नवज्योत रामपूरमधील मिलक खानम परिसरातील आपल्या कार सर्व्हिस सेंटरमध्ये असताना राखाडी रंगाच्या अल्टो कारमधून दोन हल्लेखोर तेथे आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे कारमधून उतरताना दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे. एका हल्लेखोराने सेंटरमध्ये घुसून नवज्योतवर गोळी झाडली आणि त्याला बाहेर ओढले. त्यानंतर दुसऱ्याने त्याच्या पाठीवर गोळी झाडली. नवज्योत उठून पुन्हा दुकानात गेला, मात्र तेथेही त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या भीषण हल्ल्यानंतर दोन्ही हल्लेखोर त्याच कारमधून पसार झाले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नवज्योतला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि रुग्णवाहिकेसमोर बसून निषेध केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतप्त नातेवाईकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

न्युझीलंडहून २२ सप्टेंबरला भारतात आल्याची माहिती
रामपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत अवदीपने आपण २२ सप्टेंबरला भारतात आल्याचे सांगितले. त्यानंतर तो काही काळ हॉटेलमध्ये, तर काही काळ राजनदीपच्या घरी राहिला. दोघांनी मिळून नवज्योतच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली अल्टो कार जवळच्या झुडपांमध्ये लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ती जप्त केली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि काडतुसेही जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
आठ जणांविरोधात गुन्हा दाखल
नवज्योतच्या वडिलांच्या तक्रारीवरून मिलक खानम पोलीस ठाण्यात महिलेच्या दोन्ही मुलांसह नातेवाईक अशा आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेल्या आरोपींना त्यांच्या शरीरयष्टीवरून ओळखल्याचे पोलिसांनी सांगितले. या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच अवदीप भारतात नेमका कधी आला, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
