“..म्हणून मी देश सोडला”; अफगाणिस्तान सोडल्यानंतर अशरफ घनींनी फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

तालिबानने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केलं आहे.

ran to save country from bloodshed wrote Facebook post Ashraf Ghani Taliban Afghanistan
अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे (फोटो ANI)

अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. तालिबानने अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) जाहीर केलं आहे.

२० वर्षांच्या लढाईनंतर अखेर तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. देशात हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला आहे. दरम्यान राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेले आहेत. अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे.

काबूल उद्ध्वस्त झाला असता

“जर मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. तालिबान एका ऐतिहासिक परीक्षेला सामोरे जात आहे. आता ते अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवतील,” असे घनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

मात्र, अशरफ घनी यांनी आपल्या पोस्टमध्ये ते सध्या कुठे आहेत हे सांगितले नाही. अफगाणिस्तानातील टोलो न्यूजच्या मते, घनी ताजिकिस्तानला गेले आहेत. शांती प्रक्रियेचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानला या स्थितीत आणण्यासाठी अश्रफ घनी यांना दोषी ठरवले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर काबूल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.

तालिबानी बंडखोरांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. मात्र ते शहराच्या मध्यभागाबाहेरच थांबले. दरम्यान, काही काळ काबूलच्या सीमेवर घालवल्यानंतर रविवार रात्री आपण या शहराच्या अंतर्भागात प्रवेश करू, असे तालिबानने सांगितले होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ran to save country from bloodshed wrote facebook post ashraf ghani taliban afghanistan abn