पीटीआय, न्यूयॉर्क
अभिनेता रणबीर कपूर आणि शेफ विकास खन्ना या दोन भारतीयांचा ‘टाइम’ मासिकाने २०२६च्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये यादीत समावेश केला आहे. या दोघांबरोबर गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई, यूट्यूबचे प्रमुख नील मोहन आणि न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी या भारतीय वंशाच्या अन्य व्यक्ती सर्वात १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आहेत. ही यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली.
अभिनेता आयुष्मान खुराणाने रणबीर कपूरचा परिचय लिहिताना नमूद केले आहे की, “काही अभिनेते वारशाचा पाठलाग करतात आणि काही अभिनेते आपल्या कलाकृतीतून वारसा निर्माण करतात. रणबीर कपूर यापैकी दुसऱ्या प्रकारचा अभिनेता आहे. एक अभिनेता शांतपणे पण दीर्घकाळ टिकणारा परिणाम घडवत असतो, आपली प्रेक्षक म्हणून भावनिक जडणघडण करतात. रणबीर हे काम अनेक चित्रपटांमधून करत आला आहे.”
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या पाककला कौशल्याने लोकप्रियता मिळवलेले आणि ‘करी बॉय’ नावाने प्रसिद्ध झालेले शेफ विकास खन्ना यांनी, “हा माझा सन्मान आहे आणि भारतासाठी महत्त्वाचा क्षण आहे,” अशी प्रतिक्रिया न्यूयॉर्कमधून व्यक्त केली. विकास खन्ना न्यूयॉर्कमध्ये बंगलो नावाचे भारतीय रेस्टॉरंट चालवतात. शेफ एरिक रिपर्ट यांनी विकास खन्ना यांच्या परिचयात लिहिले आहे की, “विकास यांचे दातृत्व स्वयंपाकघराच्याही पलीकडे आहे. ते करुणा, प्रतिष्ठा आणि जबाबदारीचे भान बाळगत जगभरातील विविध समुदायांशी संपर्क राखतात. त्यांना त्यांच्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे. त्यांनी जगभरातील लोकांपर्यंत भारतीय संस्कृतीच्या समृद्धपणा पोहोचवला आहे.”
