Randhir Jaiswal On India LPG Supply Crisis : आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असल्याचा फटका भारताला बसत आहे. भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा दावा विरोधक करत आहेत. मात्र, नागरिकांनी या अफवांना बळी पडू नये, गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, असं असलं तरी LPG गॅस सिलिंडरसाठी अनेक शहरांत नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
देशात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता भारत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भारत आता रशियाकडून एलपीजी खरेदी करण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिले आहेत.
रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं की,’मध्य पूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा पुरवठ्यासाठी आपले पर्याय वाढवण्यासाठी केंद्र सरकार सर्व ठिकाणांहून एलपीजी खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या इंधनाच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री सरकार करत आहे.’
रणधीर जयस्वाल काय म्हणाले?
“ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार रशियाकडूनही एलपीजी खरेदी करण्यास इच्छुक आहे. तसेच जिथे-जिथे एलपीजी उपलब्ध असेल तिथून आम्ही तो खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे जर रशियाकडून एलपीजी उपलब्ध होत असेल तर आम्ही तिथूनही घेऊ. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की, आपल्या जनतेच्या गरजा पूर्ण होतील याची खात्री करणं गरजेचं आहे. आत्ता मी एवढंच सांगू शकतो की आमच्याकडे विविध प्रकारचे पर्याय असले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
“बांगलादेश, श्रीलंका, मालदीव आणि इतर शेजारी देशांकडून भारताला ऊर्जेसाठी विनंत्या प्राप्त झालेल्या आहेत. भारत २००७ पासून विविध वाहतूक साधनांच्या माध्यमातून बांगलादेशला डिझेलचा पुरवठा करतो. आपण सध्याही बांगलादेश आणि इतर शेजारी देशांना मदत करत आहोत. पण आपल्या स्वतःच्या गरजा, शुद्धीकरण क्षमता आणि डिझेलची उपलब्धता यांचा विचार करून ही मदत केली जात आहे”, असंही रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.
PNG कनेक्शन असलेल्यांना आता LPG मिळणार नाही
एलपीजी गॅसची टंचाई होऊ नये म्हणून केंद्र सरकारने महत्वाचे निर्देश दिलेले आहेत. ज्या ग्राहकांकडे पीएनजी कनेक्शन (पाईप गॅस) असतील त्यांना LPG गॅस सिलिंडर देण्यास परवानगी दिली जाणार नाही. काही दिवसांपूर्वीच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जाहीर केलं की पाईपद्वारे गॅस कनेक्शन असलेल्या ग्राहकांना एलपीजी रिफिल देण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावं लागू शकतं.
केंद्र सरकारने म्हटलं की, “पाईपद्वारे गॅस कनेक्शन असलेल्या आणि घरगुती एलपीजी कनेक्शन असलेल्या कोणत्याही व्यक्तीने घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवू नये किंवा कोणत्याही सरकारी तेल कंपनीकडून किंवा त्यांच्या वितरकांकडून घरगुती एलपीजी सिलिंडरचं रिफिल घेऊ नये. तसेच अशा व्यक्तींना त्यांचं घरगुती एलपीजी कनेक्शन परत करावं लागेल.”
