India On Israel Attack Lebanon : गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेलं अमेरिका-इराण युद्ध नुकतंच थांबलं आहे. मात्र, दुसरीकडे इस्रायलने बुधवारी लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास २५० नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या या प्राणघातक हवाई हल्ल्यानंतर आता जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्याबाबत भारताचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. लेबनॉनमधील इस्रायली हल्ल्यांबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करत लेबनॉनमध्ये मोठ्या संख्येने झालेल्या नागरिकांच्या जीवितहानीच्या वृत्तांमुळे आम्ही अत्यंत चिंतेत असल्याचं भारताने म्हटलं आहे. याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं आहे.
रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटलं?
“लेबनॉनमध्ये मोठ्या संख्येने झालेल्या नागरिकांच्या जीवितहानीच्या वृत्तांमुळे आम्ही अत्यंत चिंतेत आहोत. लेबनॉनच्या शांतता आणि सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या UNIFIL (युनायटेड नेशन्स इंटरिम फोर्स इन लेबनॉन) ला सैन्य पुरवणारा देश म्हणून सध्या घडत असलेल्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. भारताने नेहमीच नागरिकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणं आणि देशांच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक अखंडतेचा आदर करणं आवश्यक आहे. लेबनॉनमधील आमचे दूतावास भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी त्यांच्याशी सतत संपर्कात आहेत”, असं प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
लेबनॉन आणि इस्रायलमध्ये चर्चा सुरू
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आपल्या सरकारला लेबनॉनबरोबर शांतता चर्चा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. बीरूतकडून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता त्याला प्रसिसाद म्हणून चर्चेचं पाऊल उचलण्यात आल्याचं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर यात लेबनॉनचा देखील समावेश असल्याचं इराण आणि पाकिस्तानने म्हटलं होतं. पण, इस्रायलकडून हा दावा फेटाळण्यात आला व लेबनॉनवर हल्ले सुरुच ठेवण्यात आले. या हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
बिन्यामिन नेतान्याहू यांनी काय म्हटलं?
“लेबनॉनकडून चर्चेसाठी वारंवार विनंती करण्यात येत आहे. या विनंतीचा विचार करुन मी माझ्या सरकारला लेबनॉनबरोबर लवकरात लवकर थेट चर्चा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. वाटाघाटी प्रामुख्याने हेझबोल्लाहला निःशस्त्र करणं आणि इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करणं यावर भर दिला जाईल. लेबनॉनच्या पंतप्रधानांनी बीरूतचे निःशस्त्रीकरण करण्याबाबत केलेल्या आवाहनाचं इस्रायल कौतुक करतो”, असं नेतान्याहू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
