Prajwal Revanna Jail Mobile Scandal News: बलात्कार प्रकरणात कारावासात असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी रेवण्णा तुरुंगात मोबाइल वापरत असल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर तो मोबाइल जप्त करण्यात आला. या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ आढळल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याबद्दलचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाचे प्रकरण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान चांगलेच गाजले होते. महिलांवर बळजबरी करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप रेवण्णावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी सध्या तो कारावासात आहे. मात्र कारावासात अवैधरित्या मोबाइल बाळगल्यानंतर त्याची पुन्हा चर्चा होत आहे.
बंगळुरुच्या मध्यवर्ती कारागृहात ११ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी रेवण्णा मोबाइल फोन वापरताना आढळला. रेवण्णाला ज्या बॅरेकमध्ये ठेवण्यात आले होते, तिथे तपास अधिकाऱ्यांना एक चार्जर, पेन ड्राइव्ह आणि एक वही मिळाली. पाच जण बाहेरून वस्तूंची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही धाड टाकली गेली.
मोबाइलमध्ये आढळले अश्लील व्हिडीओ
जप्त केलेला फोन आणि पेन ड्राइव्ह फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. फोनमध्ये डझनभर पॉर्न व्हिडीओ आणि पेन ड्राइव्हमध्ये वेब सीरीज असल्याचे आता उघड झाले आहे. या प्रकरणामुळे बंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहात व्हीआयपी कैद्यांना मिळणाऱ्या विशेष सुविधांवर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आता पाचही आरोपींना अटक केली आहे. तपासकर्त्यांनी सांगितले की, मोबाइल फोन तुरुंगात आणण्यासाठी रेवण्णाने ७० हजार रुपये दिले. तर सीम कार्ड घेण्यासाठी ३० हजार रुपये दिले.
तुरुंगाचे अधिकारी प्रकाश गावडे यांनी स्वतः मोबाइल फोन रेवण्णाच्या ताब्यात दिला. विचाराधीन कैदी मोहम्मद तौसिफ याने तोंडात लपवून सीम कार्ड आणले आणि ते रेवण्णाला दिले. यानंतर गावडेने रेवण्णाला चार्जर आणि पेन ड्राइव्हही पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी तुरुंगात गांजाची तस्करी केल्याप्रकरणी गावडेला अटक करून निलंबित करण्यात आले होते.
रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा
कर्नाटक उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात रेवण्णाची जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याची आणि अंतरिम जामीन देण्याची याचिका फेटाळली होती. गुन्ह्याचे गांभीर्य आणि लैंगिक शोषणाचे अनेक खटले प्रलंबित असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच तो बाहेर आल्यास साक्षीदारांवर आणि प्रलंबित खटल्यांवर दबाव येऊ शकतो, अशी भीती न्यायालयाने व्यक्त केली. लैंगिक शोषण, अश्लील चित्रीकरण आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवण्णाला ऑगस्ट २०२५ मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
