Rape in UP : उत्तर प्रदेशातील फारूखाबाद येथी एका १३ वर्षीय मुलीवर सरकारी शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे पीडिता गर्भवती राहिल्याने हा प्रकार उजेडात आला. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली असून त्याला मदत करणाऱ्या सरकारी शाळेच्या शिपाई आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

“पीडित मुलगी रात्री शौचास गेली होती. त्यावेळी तिला गावातील पंकज आणि अमितने पकडून एका रिकाम्या घरात नेले. तिथंच पंकजने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर, अमितने बाहेर उभं राहून पाळत ठेवली”, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.

“तोंडात कपडा भरून आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीने तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर तिच्या आईला ही बाब समजली. त्यानंतर आईने स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला”, असंही पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा >> Triple Talaq : आधी धर्मांतर, मग तीन तलाक; उत्तर प्रदेशात धर्मांतरविरोधी कायदा असतानाही कशी झाली महिलेची फसवणूक?

आरोपीला अद्याप अटक नाही

बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पंकज हा सरकारी शाळेत शिपाई आहे आणि त्याला एका मृत व्यक्तीच्या जागेवर नोकरी मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले. कायमगंज कोतवालीचे प्रभारी निरीक्षक राम अवतार यांनी सांगितले की, मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. “अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात लवकरच अटक केली जाईल”, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, असाच प्रकार बदलापुरात घडला होता. बदलापुरातील एका प्रतिष्ठित शाळेत चार वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा प्रकार उजेडात आल्यानंतर बदलापुरकरांनी आंदोलन पुकारलं होतं. तसंच, सरकारनेही याप्रकरणी गंभीर दखल घेतली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असून याप्रकरणी कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.