कठुआ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाईंडने बकरवाल समाजातील मुसलमानांना बाहेर काढण्यासाठी हे निर्घृण करण्यास भडकवल्याचे समजते. हे अमानवी कृत्य करण्यासाठी त्याने आपल्या भाच्यासह आणखी सहा जणांना भडकवले होते. जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात. कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असत.
आरोपपत्रात म्हटले आहे की, बकरवाल गायीची हत्या आणि अंमली पदार्थांची तस्करी करतात, अशी येथील हिंदू समाजात धारणा आहे. त्यांच्यामुळे येथील अनेक लोक नशेच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे हिंदू बकरवाल समाजाच्या लोकांना धमकावत. सांजी राम दोन्ही समाजात समजोता होण्याच्या विरोधात होता. बकरवाल समाजाला येथून पळवण्यासाठी एक योजना बनवावी, असे तो नेहमी येथील हिंदू समाजातील लोकांना सांगायचा.
गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासानुसार, अल्पवयीन मुलीला मंदिरात ठेवण्यात आले. तिला अंमली पदार्थ देण्यात आले. त्यानंतर तिच्या हत्येपूर्वी एक आठवडाभर अनेकवेळा सामूहिक बलात्कार करण्यात आला. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मंदिरात डांबून ठेवलेल्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यासाठी एक आरोपी खास मेरठहून आला होता. तुझी वासना जर मिटवायची असेल तर इकडे ये, असे त्याला सांगण्यात आले होते. त्यानंतर एका पोलीस असलेल्या आरोपीला मुलीची हत्या करण्यापूर्वी पुन्हा एकदा बलात्कार करायचा होता. त्यानंतर इतर लोकांनीही तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. नंतर मुलीची हत्या करण्यात आली. मुलीचे डोके अनेकवेळा दगडावर आपटले होते. बलात्कारातील आरोपी रामला वाचवण्यासाठी पोलिसांना दीड लाख रूपये देण्यात आले होते.
दुसरीकडे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईकांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यासाठी आरोपींचे नातेवाईक आणि हिंदू एकता मंचच्या वतीने यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.