लंडनमधील रुग्णांपैकी ४० टक्के नव्या विषाणूने बाधित

करोनाचा ओमायक्रॉन हा उत्परिवर्तीत विषाणू ब्रिटनमध्ये अभूतपूर्व वेगाने पसरत असून लंडनमधील एकूण करोनाबाधितांपैकी ४० टक्के हे ओमायक्रानचे रुग्ण आहेत. करोना लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा धोका असल्याने आता वर्धक मात्रा घेण्याची गरज आहे, असे ब्रिटिश सरकारने म्हटले आहे.

देशात २७ नोव्हेंबरला ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्यापासून आतापर्यंत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी करोना निर्बंध आणखी कठोर केले आहेत. आता ओमायक्रॉनची मोठी लाट येत आहे, अशा इशारा त्यांनी रविवारी नागरिकांना दिला.

 वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, या महिना अखेरपर्यंत लक्षावधी लोक ओमायक्रॉनने बाधित होऊ शकतात, असे सरकारचे म्हणणे आहे.

ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजीद जाविद यांनी स्काय न्यूजला सांगितले की, ओमायक्रॉनचा प्रसार हा अभूतपूर्व वेगाने होत आहे. या विषाणूमुळे बाधित झालेल्यांची संख्या दोन ते तीन दिवसांतच दुप्पट होत आहे. याचाच अर्थ आता करोनाच्या महालाटेला सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे विषाणूविरोधात लशीचे संरक्षण मिळविण्याला अग्रक्रम दिला आहे.

नव्याने करोना निर्बंध लागू केल्याने पंतप्रधान जॉन्सन यांना पक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीदरम्यान पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट कार्यालयात मेजवान्या झाल्याच्या आरोपांवरून त्यांना लक्ष्य केले जात आहे. जॉन्सन यांनी लोकांना जीवित रक्षणासाठी  करोना लशीची वर्धक मात्रा घेण्याचे आवाहन केले आहे.

  पहिला बळी

ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेल्या एकाचा मृत्यू झाला असून करोनाच्या या उत्परिवर्तीत विषामूळे देशात गेलेला हा पहिला बळी असल्याची माहिती ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी दिली. करोनाच्या संभाव्य लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येऊ नये यासाठी लोकांना करोना लशीची वर्धक मात्रा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वर्धक मात्रा घेतल्यास ओमायक्रॉनवर मात करणे शक्य होईल, असा दावा त्यांनी केला.

   लंडनमधील एका लसीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर जॉन्सन पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी लसमात्रा घेतलेल्या नागरिकांचे कौतूक केले.

ओमायक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दु:खाची बाब आहे. हा करोना विषाणूचा तुलनेत कमी जोखमीचा प्रकार असल्याची बाब आपण बाजूला ठेवली पाहिजे. त्याऐवजी या विषाणू लोकांत अत्यंत वेगाने पसरतो, याची जाणीव ठेवली पाहिजे, असे जॉन्सन म्हणाले.

नाताळच्या कालावधीत करोना निर्बंध कठोर करणार काय, या प्रश्नावर थेट उत्तर देणे त्यांनी टाळले.

करोना संसर्गापासून सुरक्षित राहण्याठी लशीच्या दोन मात्रा पुरेशा नाहीत. तीन मात्रा घेतल्यास लक्षणे दिसणाऱ्या संसर्गापासून उत्तम बचाव होतो. वर्षअखेरपर्यंत सर्वच प्रौढांना वर्धक मात्रा देण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. सध्या दिवसाला ५,३०,००० लोकांना लस दिली जाते. हे प्रमाण दिवसाला दहा लाख लाभार्थींपर्यंत वाढविले जाणार आहे.

– साजीद जाविद, ब्रिटनचे आरोग्यमंत्री