Rapido Driver Bank Fraud case reveals massive 300 crore money laundering: देशभरात अवैध क्रिकेट बेटिंग आणि स्टॉक मार्केट रॅकेटचा भांडाफोड करण्याचे काम ईडीकडून सुरू आहे. यावेळी अहमदाबादमध्ये एक अजब प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. येथील एका रॅपिडो चालकाच्या बँक खात्यात तब्बल ३०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, या चालकाला मासिक १० ते १२ हजारांचे वेतन मिळते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हवाला साखळी उध्वस्त केली असून एकूण ५५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणला आहे.
रॅपिडो चालकाच्या खात्यात ३०० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना या साखळीचा शोध लागला. संपूर्ण देशभरात नियोजित पद्धतीने आर्थिक गुन्ह्याचे रॅकेट चालवले जात असल्याचे तपासकर्त्यांच्या निदर्शनास आले.
प्रदीप ओडेच्या खात्यात मोठी रक्कम कशी आली?
दरमहा १० ते १२ हजार रुपये कमावणाऱ्या प्रदीप ओडेच्या बँक खात्यात एकदम ३०० कोटी रुपये आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाल्या. प्रदीपच्या खात्यात एकामागून एक असे मोठे व्यवहार होऊ लागल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आला. अवैध क्रिकेट बेटिंग आणि शेअर बाजारात केलेल्या हेराफेरीतील रक्कम वळविण्यासाठी प्रदीप ओडेच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला होता.
प्राथमिक तपासानंतर ईडीच्या सहायक संचालकांनी अहमदाबादच्या गुन्हे शाखेत औपचारिक तक्रार दाखल केली. प्रदीप ओडेची चौकशी झाली असता त्याने मान्य केले की, किरण परमार नामक व्यक्तीला त्याने त्याचे बँक खाते भाड्याने दिले होते. यासाठी त्याला किरण परमारकडून २५,००० रुपये मिळाले होते. तसेच स्वाक्षरी केलेल्या प्रत्येक धनादेशासाठी प्रदीपला ४०० रुपये दिले जात होते, असेही प्रदीपने सांगितले.
एवढेच नाही तर फसवणूक करणाऱ्यांनी प्रदीप ओडेच्या ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांच्या आधारे प्रदीप एंटरप्राइजेस नावाची कंपनीही स्थापन केली होती. तसेच तपासकर्त्यांना आढळले की, कमलेश ट्रेडिंग आणि रौनक ट्रेडर्स नामक कंपन्याही अशाच प्रकारे स्थापन करण्यात आल्या होत्या. या दोन कंपन्यांच्या खातत्यातही ५५० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे समोर आले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑनलाइन क्रिकेट बेटिंग ऑपरेशन्समधून मिळणारा निधी वळविण्यासाठी या खात्याचा वापर केला गेला.
शेअर बाजारात फेरफार करून घोटाळा
ईडीच्या तक्रारीनुसार, या बँक खात्याचा वापर करून अवैध सट्टेबाजी करण्यात आली. पेनी स्टॉकचे दर कृत्रिमरित्या वाढविण्यासाठी सर्क्युलर ट्रेडिंगच्या माध्यमातून मनी लाँडरिंग करण्यात आले. मुख्य आरोपी आणि या रॅकेटचा मेंदू मानला जाणारा किरण परमार हे गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे समोर आले आहे.
महादेव जुगल, रवी आणि जीवराज अशा इतर आरोपींची नावेही समोर आली आहेत. ज्यामध्ये सिम कार्डची व्यवस्था करणे, चेक बुकची काळजी घेणे आणि बँक व्यवहारांवर नजर ठेवण्यासारखी कामे हे लोक करत होते. ईडीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे.
