महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या रॅपिडो पिंक सेवेसंदर्भात एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. इन्स्टाग्राम क्रिएटर शालिनी चतुर्वेदी यांनी पिंक राईड बुक केल्यानंतर त्यांच्यासमोर महिला चालकाऐवजी पुरुष चालक आल्याचा दावा केला आहे. शालिनी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले की, त्यांनी मुद्दाम रॅपिडो पिंक सेवा निवडली होती, कारण या सेवेत महिला प्रवाशांना महिला चालक उपलब्ध करून दिले जातात. मात्र, बुकिंगनंतर त्यांना एका पुरुषाचा फोन आला.

शालिनी यांनी त्या चालकाला सांगितले की, त्यांनी महिला चालकासाठीच पिंक सेवा निवडली आहे. त्यावर चालकाने कथितपणे, “मॅडम, मी गे आहे,” असे उत्तर दिले. यानंतर शालिनी यांनी राईड रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुमारे २५ रुपयांच्या राईडसाठी त्यांना १५ रुपये रद्द करण्याचे शुल्क आकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, ॲपवर दिसणारा प्रोफाइल फोटो एका महिलेचा असल्याचेही त्यांनी म्हटले.

“समोर एक पुरुष उभा आहे. त्याने माझा चेहरा पाहिला आहे. मी कोणत्या इमारतीत राहते, हे त्याला माहिती झाले आणि मी काहीही करू शकत नाही,” असे शालिनी यांनी व्हिडीओमध्ये म्हटले. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी, “महिलांची सुरक्षा हा फक्त नफा कमावण्याचा व्यवहार बनला आहे. ही एक थट्टाच आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.

पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रॅपिडो कंपनीने याची दखल घेतली. कंपनीने दिलगिरी व्यक्त करत म्हटले की, पिंक राईड सेवा केवळ महिला चालकांसाठी आहे आणि पुरुष चालकाची नियुक्ती कशी झाली, याची चौकशी केली जाईल.

कंपनीने संबंधित चालकाच्या वर्तनाची तपासणी तसेच राईड रद्द केल्यानंतर आकारण्यात आलेल्या शुल्काचा मुद्दाही तपासण्याचे आश्वासन दिले. यानंतर शालिनी यांनी आणखी एक अपडेट शेअर करत सांगितले की, सुरुवातीला कंपनीने चालकाला इशारा देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कंपनीने संबंधित चालकाची सेवा समाप्त केल्याची माहिती दिली.

शालिनी यांच्या मते, चालकाने महिला नातेवाईकाचा फोटो वापरून पिंक सेवेत प्रवेश केला होता. रॅपिडोने चालकाला हटवल्याचे पुरावेही दिले असून, ही कारवाई समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी ‘राईड-हेलिंग’ प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा तपासणी, चालक पडताळणी आणि जबाबदारीच्या प्रश्नांवर चर्चा सुरू केली आहे.