भारतीय लष्कराच्या तळांवर नुकताच दहशतवादी हल्ला झाला होता. भारतीय जवानांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सूचनेवरून राजस्थान संस्कृत अॅकेडमीच्या वतीने ‘राष्ट्र रक्षा यज्ञ’चे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थानमधील भारत-पाक सीमेवरील श्री मातेश्वरी तनोट राय मंदिरात २१ ‘देशभक्त ब्राह्मणांद्वारे’ हा महायज्ञ करण्यात येणार आहे. या महायज्ञात मुख्यमंत्री वसुंधरा राजेही सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हेही महायज्ञासाठी हजेरी लावण्याची शक्यता आहे.
महायज्ञाशिवाय अॅकेडमीने जवानांची सुरक्षितता आणि जगात शांतता निर्माण होण्यासाठी २६ वेद विद्यालयात आधीपासूनच मंत्रोच्चार सुरू केले आहेत. नवरात्रीत चालणाऱ्या या मंत्रोच्चारात ५०० हून अधिक विद्यार्थी आणि अॅकेडमीचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.

जवानांचे मनोबल वाढावे यासाठी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या स्वत: एक पुजा करणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. या यज्ञामुळे सीमेजवळ राहणारे नागरिकही सुरक्षित राहतील असे निवेदनात म्हटले आहे. राजस्थान आणि पाकिस्तान यांच्यात सुमारे १०४० किलोमीटर इतकी सीमा आहे. मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हेही सामील होण्याची शक्यता असल्याचे संस्कृत अॅकेडमीचे संचालक राजेंद्र तिवारी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी सांगितले.
पूर्वीच्या काळापासून अशाप्रकाराचे यज्ञ होतात. आपल्या जवानांना उर्जा मिळावी, त्यांचे मनोबल वाढावे आणि शत्रूंपासून त्यांचे रक्षण व्हावे यासाठी मंत्र जप करण्याची योजना बनवल्याचे राजस्थान संस्कृत अॅकेडमीच्या अध्यक्षा जया दवे यांनी म्हटले.
या महायज्ञासाठी ‘राष्ट्रभक्त ब्राह्मण’ च का निवडण्यात आले याविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, या अॅकेडमीबरोबर पूर्वीपासून ब्राह्मण जोडले गेलेले आहेत. त्यांच्या क्षमतेच्या आधारावर त्यांची निवड राष्ट्र रक्षा यज्ञासाठी केली आहे. तसेच ब्राह्मणांद्वारे जवानांसाठी प्रार्थना करणे ही आपली सनातन परंपरा आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा क्षत्रिय युद्ध लढण्यासाठी जात तेव्हा ब्राह्मण अशी पूजा करत असत असेही त्या म्हणाल्या.