राष्ट्रपती भवनाच्या मध्यवर्ती प्रांगणात गेल्या अनेक दशकांपासून एक कांस्य पुतळा उभा होता, ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी भेट दिली आहे. रविवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो पुतळा हटवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. आता त्या जागी स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे.

सी. राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. याआधी त्या ठिकाणी ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांचा अर्धपुतळा होता. लुटियन्स यांनी नवी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित वास्तूंची रचना केली होती. राष्ट्रपती भवनातील अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेसवर लुटियन्स यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर उपस्थित होते.

‘मन की बात’मध्ये घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी झालेल्या ‘मन की बात’च्या १३१ व्या भागात लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली. त्या वेळी मोदी म्हणाले होते की, देश आता गुलामगिरीची चिन्हे मागे सोडत असून भारतीय संस्कृतीशी निगडित प्रतीकांना प्राधान्य देत आहे.

राजाजी यांच्या नवीन अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘राजाजी उत्सव’च्या निमित्ताने केले. या उत्सवाअंतर्गत आयोजित प्रदर्शन १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रपती भवनातील भव्य खुल्या पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात हा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला आहे. राष्ट्रपती सचिवालयाने स्पष्ट केले की, वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांपैकी हा एक भाग आहे. विशेष म्हणजे, ज्या इमारतीची रचना लुटियन्स यांनी स्वतः केली होती, त्याच इमारतीतून आता त्यांची प्रतिमा हटवण्यात आली आहे.

एडविन लुटियन्स यांचे प्रारंभिक आयुष्य

लुटियन्स यांच्या सुरुवातीच्या आयुष्याविषयी माहिती त्यांच्या मुलगी मेरी लुटियन्स यांनी दिली आहे. लुटियन्स ट्रस्टने प्रकाशित केलेल्या लेखनात त्यांनी नमूद केले आहे की, एडविन लुटियन्स यांचा जन्म २९ मार्च १८६९ रोजी झाला. ते चार्ल्स आणि मेरी लुटियन्स यांच्या तेरा मुलांपैकी दहावे अपत्य आणि नववे पुत्र होते. त्यांचे वडील कॅप्टन चार्ल्स ऑगस्टस हेन्री लुटियन्स हे सैनिक आणि चित्रकार होते, तर आई मेरी थेरेसा गॅलवे आयर्लंडमधील गृहिणी होत्या. लहानपणी संधिवाताच्या तापामुळे ते खूप अशक्त होते, त्यामुळे त्यांनी पारंपरिक सार्वजनिक शाळा किंवा विद्यापीठात शिक्षण घेतले नाही. त्यांचे टोपणनाव ‘नेड’ असे होते.

त्यांनी साउथ केन्सिंग्टन स्कूलमधील शिक्षण अर्धवट सोडले आणि नंतर काही वास्तुविशारदांच्या कार्यालयात शिकाऊ म्हणून काम केले. वयाच्या १९ व्या वर्षी, १८८८ मध्ये त्यांनी स्वतःची वास्तुविशारद म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. त्यांची तुलना ख्रिस्तोफर रेन यांच्याशी करण्यात आली, ज्यांनी १६६६ च्या ग्रेट फायरनंतर सेंट पॉल कॅथेड्रलसह लंडनमधील अनेक भागांची पुनर्बांधणी केली होती.

ग्रामीण घरांपासून साम्राज्याच्या राजधानीपर्यंत

लुटियन्स यांनी बाग डिझायनर गर्ट्रूड जेकिल (Gertrude Jekyll) यांच्यासोबत भागीदारीत ब्रिटिश ग्रामीण घरे डिझाइन करून मोठी प्रतिष्ठा मिळवली. अनेक समीक्षकांनी त्यांना विसाव्या शतकातील महान ब्रिटिश वास्तुविशारदांपैकी एक म्हटले आहे. १९११ च्या दिल्ली दरबारात राजा जॉर्ज पाचव्याने ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्याची घोषणा केली. त्यानंतर लुटियन्स यांची नवीन शहरासाठी मुख्य वास्तुविशारद म्हणून नियुक्ती झाली. सहकारी वास्तुविशारद सर हर्बर्ट बेकर यांच्यासोबत काम करत त्यांनी पाश्चात्य नव-क्लासिक शैलीला मुघल, बौद्ध आणि हिंदू वास्तुशैलीशी एकत्रित करून संकरित इंडो-युरोपियन शैली विकसित केली.

या प्रकल्पातून व्हाईसरॉय हाऊस (आताचे राष्ट्रपती भवन), इंडिया गेट, नॉर्थ आणि साउथ ब्लॉक, कनॉट प्लेस आणि किंग्जवे (आताचे राजपथ/कर्तव्य पथ) यांसारख्या भव्य वास्तूंची निर्मिती झाली.

‘लुटियन्स दिल्ली’

‘लुटियन्स दिल्ली’ हा शब्द मूळतः भौगोलिक वर्णनासाठी वापरला जात होता. १९२० ते १९४० च्या दशकात डिझाइन केलेल्या कमी उंचीच्या बंगल्यांचा, झाडांनी वेढलेल्या रस्त्यांचा आणि औपचारिक इमारतींचा सुमारे २६ चौरस किलोमीटरचा हा परिसर आहे. २००२ मध्ये या परिसराचा जागतिक स्मारक निधीच्या १०० धोकादायक स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.