नवी दिल्ली : भाजपबरोबर असलेले काही मुद्दे (सम इश्यूज) असले तरी ही ‘कौटुंबिक बाब’ असून त्यावर तोडगा काढला जाईल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले. केरळच्या पलक्कड येथील राष्ट्रीय समन्वय बैठकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपबरोबर असलेल्या संबंधांवर संघाच्या नेतृत्वाकडून प्रथमच भाष्य करण्यात आले आहे.

संघ आणि भाजपमध्ये असलेल्या कथित समन्वय आभावाबाबत विचारले असता आंबेकर म्हणाले, की काही व्यवहार्य अडचणी येतात, पण त्यावर मात करण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा आहे. आमच्या औपचारिक-अनौपचारिक बैठका होत असतात. हेच सर्व प्रश्नांचे उत्तर असल्याचे आमच्या १०० वर्षांच्या प्रवासावरून तुम्हाला आढळून येईल. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये समन्वयाचा आभाव आणि संघामधील संभाव्य निरुत्साह याचाही आंबेकर यांनी ओझरता उल्लेख केला.

हेही वाचा >>>‘आर. जी. कर’च्या माजी प्राचार्यांना अटक

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्ष आता ‘सक्षम’ झाल्याचे विधान केले होते. यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे संकेत आंबेकर यांनी दिले. ‘हे मुद्दे सोडविले जातील. हा कौटुंबिक विषय आहे. तीन दिवसांच्या या बैठकीत सर्वजण सहभागी झाले होते. सर्वकाही व्यवस्थित आहे,’ असे ते म्हणाले. भाजप आणि संघाच्या संबंधांवरील प्रश्नांच्या उत्तरात आंबेकर यांनी एकदाही संघ आणि भाजपमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचे स्पष्टपणे सांगितले नाही.

दीर्घकालीन प्रवासात एक गोष्ट स्पष्ट आहे. संघ म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’. हे सनातन राष्ट्र आहे आणि भविष्यात विकासाची क्षमता आहे याची प्रत्येक स्वयंसेवकाला खात्री आहे. हा संघाचा मुख्य आधार आहे आणि अन्य विषय हे केवळ व्यावहारिक मुद्दे आहेत. – सुनील आंबेकरअखिल भारतीय प्रचार प्रमुख, रा. स्व. संघ