scorecardresearch

युक्रेनच्या नागरी भागांवर हल्ले सुरूच

रशियाकडून युक्रेनच्या नागरी भागांत हल्ले होत असल्याची चौकशी करण्याची मागणी विविध देशांच्या नेत्यांकडून होत असतानाच शुक्रवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह पश्चिमेकडील शहर ल्व्हिव्ह आणि लगतच्या प्रदेशांत नवे क्षेपणास्त्र हल्ले केले.

Ukraine Chernihiv Region

कीव्ह : रशियाकडून युक्रेनच्या नागरी भागांत हल्ले होत असल्याची चौकशी करण्याची मागणी विविध देशांच्या नेत्यांकडून होत असतानाच शुक्रवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हसह पश्चिमेकडील शहर ल्व्हिव्ह आणि लगतच्या प्रदेशांत नवे क्षेपणास्त्र हल्ले केले. ल्व्हिव्ह परिसरात किमान तीन मोठे स्फोट झाल्याचे त्या शहराच्या महापौरांनी सांगितले. दरम्यान बुधवारी रशियाने हल्ला केलेल्या मारियूपोल थिएटरच्या अवशेषांखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम अद्याप सुरूच आहे, असे शुक्रवारी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले. तेथून ३०० जणांची सुटका करण्यात आली असून अद्याप एक हजार लोक बेपत्ता  आहेत. 

 मोदी यांच्याशी चर्चा करू- मॉरिसन

 नवी दिल्ली : युक्रेनमधील स्थिती आणि त्याचे हिंदू-प्रशांत होणारे परिणाम याबाबत आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आभासी परिषदेत चर्चा करणार आहोत, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितले आहे. ही चर्चा २१ मार्च रोजी होणार आहे. मॉरिसन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिषदेत उभय देशांचे व्यापारी आणि गुंतवणूक संबंध दृढ करून नव्या आर्थिक संधी तयार करणे, त्यातून आर्थिक वाढ साधणे यावर भर दिला जाईल.

अरनॉल्ड यांचे पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन

वॉशिंग्टन : हॉलीवूड अभिनेते अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी समाजमाध्यमांवर चित्रफीत प्रदर्शित करून युक्रेनसोबतचे युद्ध रशियाने संपुष्टात आणावे, असे आवाहन केले. रशियन नागरिकांना युक्रेन युद्धाबाबत असत्य माहिती दिली जात असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी युक्रेन सैनिकांना बलिदान द्यावे लागत आहे, असा आरोप त्यांनी केला. अरनॉल्ड रशियन नागरिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते असून  पुतिन यांचेही आवडते अभिनेते आहेत. पुतिन यांचे ट्विटर अकाऊंट केवळ २२ अकाऊंटला फॉलो करते. अरनॉल्ड त्यापैकी एक आहेत.

 ‘रशियन सैनिकांना सांगण्यात आले आहे की तुम्ही युक्रेनमधील नाझींशी लढण्यास जात आहात किंवा युक्रेनमधील रशियन वंशाच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी  किंवा  लष्कर सरावासाठी जात आहात. तुमचे स्वागत एखाद्या नायकासारखे केले जाणार आहे. बहुतेक सैनिकांना आता माहीत झाले आहे की हे दावे बनावट असून आपल्याला असत्य सांगण्यात आले आहे,’ असे श्वार्झनेगर यांनी म्हटले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाबाबत अरनॉल्डने नऊ मिनिटांची एक भावुक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रदर्शित केली. हे एक अवैध युद्ध असून या एका तथ्यहीन युद्धासाठी तुम्ही आपले जीवन आणि भविष्याचे बलिदान देत आहात. या युद्धाची जगभरातील देशांनी कठोर निंदा केली आहे, असे अरनॉल्डने रशियन नागरिकांना व सैनिकांना उद्देशून केलेल्या चित्रफितीत सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rassia ukrain war attacks on civilian areas continue inquiry missile attacks ysh

ताज्या बातम्या