Rat Steals Gold Jewellery video : कर्नाटकमधील तुमकुरू येथे एका अजब घटनेत, एका उंदराने सराफाच्या दुकानातून तब्बल १० लाख रुपये किमतीचे हिऱ्यांचे दागिने पळवल्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा हा प्रकार समोर आल्याने दुकानाचा मालक आणि कर्मचारी चक्रावून गेले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

ही घटना तुमकुरू शहरातील कॅल्टेक्स सर्कलजवळील विश्वास ज्वेलरी या दुकानात घडली. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचाऱ्यांनी दुकान उघडलं तेव्हा ५० ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे हिऱ्यांचे आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, दुकानात चोरी झाल्याचं कोणतंही निशाण नव्हतं. दुकानाचे शटर सुरक्षित होतं, कुठेही तोडफोड झाली नव्हती आणि रात्रीच्या वेळी कोणी आत घुसल्याचंही चिन्हं नव्हतं. तरीही सोन्याच्या साखळ्या (चेन्स) आणि हिऱ्यांच्या अंगठ्या गायब झाल्या होत्या.

याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. सीसीटीव्ही पाहिले असता त्यांना मोठा धक्काच बसला. एक उंदीर एकेक करून ते दागिने घेऊन जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. तो उंदीर जमिनीवरून दागिने ओढत आपल्या बिळाकडे नेताना फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होता. त्या उंदराच्या हालचालींवरून कर्मचाऱ्यांनी त्याच्या बिळाचा शोध घेतला आणि ते बीळ खोदले.

कर्मचाऱ्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले. बिळामधून १० अंगठ्या आणि ३ साखळ्यांसह सर्व गायब झालेले दागिने सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामुळे दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. या विचित्र आणि अनोख्या घटनेची सध्या परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. या चोर उंदराचा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.