भारतीय उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आणि टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ऑनलाइन माध्यमांतून परसरवला जाणारा द्वेष आणि सायबर बुलिंग (दादागिरीला) थांबवण्याचं आवाहन केलं आहे. हे वर्ष आव्हानात्मक असून अशावेळी एकमेकांना पाठिंबा आणि आदार दिला पाहिजे असंही रतन टाटा म्हणाले आहेत. रतन टाटा यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

ऑनलाइन माध्यमांवर लोकं एकमेकांना लागेल असं आणि एकमेकांना घालून पाडून बोलतात असं म्हणत टाटा यांनी ऑनलाइन माध्यमांवरील द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यांवर, हॅशटॅग, ट्रेण्ड्स आणि पोस्टवर आक्षेप घेतला आहे. “या ना त्या माध्यमातून हे वर्ष सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. ऑनलाइन माध्यमांवरील लोकं एकमेकांना त्रास देत असल्याचे मला पहायला मिळत आहे. एकमेकांना खाली खेचणं, टोकाची भूमिका घेणं आणि पटकन एखाद्याबद्दल मत बनवणं असे प्रकार होत आहेत,” असं रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. “या वर्षी आपण पूर्वीपेक्षा जास्त चांगल्यापद्धतीने एकत्र राहत एकमेकांना मदत करण्याचं आहे. एकमेकांना खाली खेचण्याचा हा वेळ नाही,” असंही टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एकमेकांबद्दल संवेदनशील राहण्याबरोबरच आज आपल्याला जे चित्र दिसत आहे त्यापेक्षा अधिक दयाळू, एकमेकांना समजून घेणं आणि संयम बाळगणं गरजेचं आहे असं आवाहनही टाटा यांनी आपल्या पोस्टमधून केलं आहे. “मी खूप कमी वेळ ऑनलाइन असतो. निमित्त काहीही असलं तरी एकमेकांवर दादागिरी करण्याऐवजी आणि द्वेष पसरवण्याऐवजी हे माध्यम सहानुभूती देणारं, पाठिंबा देणारं ठरो अशी माझी इच्छा आहे,” असंही टाटा यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Tata (@ratantata) on

मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या कारणांमुळे टोकाची भूमिक मांडणाऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. यामध्ये अगदी एकमेकांना धकमी देण्यापासून ते एखाद्या व्यक्तीला घालून पाडून बोलणं, शिव्या देणं यासारखे प्रकार वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर टाटांनी सर्वांना एकत्र येऊन या कठीण प्रसंगी एकमेकांना आधार देऊ असं आवाहन करणारी ही पोस्ट शेअर केल्याचे दिसत आहे.